नवी दिल्ली – भारताच्या अव्वल महिला मुष्टियुद्धपटूचा लैंगिक छळ करणाऱ्या हरियाणाच्या एका प्रशिक्षकाला मंगळवारी पोलिसांनी अटक केली आहे. संदीप मलिक असे या प्रशिक्षकाचे नाव आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये सरस कामगिरी करत असलेल्या या 19 वर्षीय महिला खेळाडूने मलिक याने आपले लैंगिक शोषण केल्याची तक्रार केली होती, त्यानंतर त्याला सोनीपत येथून ताब्यात घेण्यात आले.
मलिकने आपल्यावरील आरोप मान्य केले आहेत.प्रशिक्षक मलिक यांच्यासह मुष्टियुद्धपटू पश्चिम बंगालमध्ये 29 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत झालेल्या मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी गेले होते.
हरियाणा संघातील ही महिला खेळाडूदेखील या संघात होती, राजधानीतून दुरांतो एक्स्प्रेसने खेळाडूंनी प्रवास केला होता. या प्रवासादरम्यान मलिकने या महिला खेळाडूचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. स्पर्धा संपल्यावर जेव्हा संघ परतला तेव्हा या महिला खेळाडूने प्रशिक्षकाबद्दल तक्रार केली होती.