कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी पक्षांचा लोकसभेतून सभात्याग
नवी दिल्ली – विरोधी पक्षाच्या सदस्यांना प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्न विचारू दिले जात नसल्याची तक्रार करून विरोधी सदस्यांनी आज लोकसभेतून सभात्याग केला. त्यात कॉंग्रेस, द्रमुक, राष्ट्रवादी कॉंग्रेस या पक्षांचा समावेश होता. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे अधिकृत भाषा या विषयावर उत्तर देत असताना त्यांना या विषयाच्या अनुषंगाने काही पुरवणी प्रश्न विरोधी सदस्यांकडून विचारले गेले. पण सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना हे प्रश्न विचारू दिले नाहीत व त्यांनी दुसरा प्रश्न पुकारला. त्यावर विरोधी सदस्य संतापले.
द्रमुकचे नेते टीआर बालू यांनी विरोधकांचा पुरवणी प्रश्न विचारण्याचा अधिकार का रोखला जात आहे असा प्रश्न सभापतींना विचारून आपला निषेध नोंदवला. यावेळी राहुल गांधी यांनीही पुरवणी प्रश्न विचारण्यास सदस्यांना अनुमती दिली गेली पाहिजे अशी मागणी केली. परंतु तरीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करून सभापती बिर्ला यांनी पुढील प्रश्न उपस्थित केल्यामुळे विरोधकांनी निषेध करीत सभात्याग केला.
या आधीही राहुल गांधी यांनी देशातील 50 मोठ्या कर्ज बुडव्यांची यादी सरकार का जाहीर करीत नाही असा प्रश्न उपस्थित केला होता व त्यांना या अनुषंगाने काही पुरवणी प्रश्न विचारायचे होते त्यांनाही त्यावेळी मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे त्यांनीही सभापतींच्या या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.