दोषींवर कठोर कारवाई करा : मारुती भापकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
पिंपरी -रिझर्व बॅंकेने “यस’ बॅंकेवर निर्बंध लागु करून बॅंकेचे संचालक मंडळ 30 दिवसांसाठी स्थगीत केले आहे. या बॅंकेची आर्थिक स्थिती गंभीररित्या घसरल्यामुळे खातेदारांना बॅंकेतून आता जास्तीत जास्त 50 हजार रुपये काढता येतील, असा निर्णय केद्र सरकारने अधीसुचनेद्वारे जाहीर केला आहे. त्या अनुंषगाने पिंपरी चिंचवड महापालिका देखील यस बॅंकेची खातेदार असून महापालिकेचे या बॅंकेत 950 कोटी रूपये अडकले आहेत.
सध्या सत्तारुढ भाजपा पदाधिकारी आणि महापालिकेतील अधिकाऱ्यांनी केवळ टक्केवारीच्या अमिषापोटी या बॅंकेशी व्यवहार करून ठेवी ठेवल्या आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी नगरसेवक मारूती भापकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात भापकर यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड महापालिकेत सन 2017 ला सत्तांतर झाले पारदर्शकतेच्या नावाखाली येथील जनतेने भारतीय जनता पक्षाला मोठ्या विश्वासाने सत्तासिंहासनावर विराजमान केले. मात्र या पक्षाने शहरवासियांचा विश्वासघात केला.
तत्कालीन स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे व आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महापालिकेच्या रक्कमा खासगी बॅंकेमध्ये अल्पमुदतीत (सहा महीने) ठेवण्याचा आम्ही निर्णय घेतल्यामुळे सहा महिन्याला 50 कोटी, वर्षाला 100 कोटी तर पाच वर्षात 500 कोटी रूपयांचे महापालिकेला अधिकचे उत्पन्न मिळणार असा दावा त्यांनी केला होता. यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथील एका जाहीर कार्यक्रमात या निर्णयाची स्तुती करत, महापालिका पदाधिकाऱ्यांची पाठ थोपटुन जाहीर कौतुक केले होते.
वास्तविक पाहता मनपाने अशा मोठ्या स्वरूपातील रक्कम या राष्ट्रीयकृत बॅंकांमध्ये ठेवणे अपेक्षित असताना देखील केवळ यामधुन टक्केवारी मिळणार असल्याच्या अमिषाने मनपाच्या तत्कालीन पदाधीकाऱ्यांनी यस बॅंकेशी अर्थिक व्यवहार सुरू ठेवले. या बॅंकेशी आर्थिक व्यवहार करत असताना महापालिकेच्या प्रचलित कार्यपध्दतीप्रमाणे महापालिकेचे मुख्य लेखापाल यांच्याकडुन स्थायी समितीच्या समोर हा विषय आणण्यात आला. त्यामुळे 2017 पासून आतापर्यंतच्या सभापती व सत्ताधारी व विरोधी पक्षातील स्थायी समिती सदस्यांनी या निर्णयामधे आपआपले अर्थिक हितसंबंध जोपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी केली. त्यामुळेच या शहरातल्या करदात्या नागरिकांच्या 984 कोटी रुपयांच्या रक्कमेवर गंडातर येते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या या गंभीर प्रकरणाबाबत शासनाच्या स्तरावरून उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या मार्फत चौकशी करून यातील दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी भापकर यांनी केली आहे.
“येस’ बॅंकेत आयुक्तांचा नातेवाईक?
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा नातेवाईक यस बॅंकेत वरिष्ठ पदावर असून त्याचे हिज जोपासण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोपही भापकर यांनी केला आहे. संबंधिताचे हित जोपासण्यासाठी शहरवासियांच्या 984 कोटी रुपयांवर गंडांतर आणणाऱ्या आयुक्तांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भापकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.