नवी दिल्ली : येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर आणि कॉंग्रेस पक्षाच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वढेरा यांच्यातील आर्थिक संबंधांवर भाजपने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
प्रियंका गांधी वढेरा यांनी येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांना दोन कोटी रुपयांच्या अत्यल्प किंमतीवर पेंटिंग विकल्याचा मुद्दा भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.
हे प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित असून जेथे भ्रष्टाचार आहे, तेथे कॉंग्रेसचा संबंध असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राणा कपूर यांना प्रियंका गांधींनी जी पेंटिंग विकली होती ती 1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांना प्रसिद्ध चित्रकार एम.एफ. हुसैन यांनी कॉंग्रेसच्या शताब्दी वर्षानिमित्त भेट दिलेली होती, असा दावा पात्रा यांनी केला. कॉंग्रेस प्रमुख म्हणून राजीव गांधींना जी पेंटिंग भेट म्हणून दिली जातात.
ती राजीव गांधी, वढेरा यांची वैयक्तिक संपत्ती कशी बनते असा सवालही त्यांनी केला. कपूर यांच्या खात्यात गुन्हेगारी व्यवहारांचे पैसे होते, म्हणून प्रियंका गांधी वढेरा यांनी केलेल्या चित्रकलेच्या विक्रीसंदर्भात संपूर्ण चौकशी केली पाहिजे, अशी भाजपची मागणी आहे, असे ते म्हणाले.
येस बॅंकेचे संस्थापक कपूर यांच्याविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या सक्त वसुली संचालनालयाला त्यांच्या ताब्यात असलेली 44 महागडी पेंटिंग्ज सापडली आहेत. त्यातील एक चित्र राणा कपूर यांनी प्रियंका गांधी वढेरांकडून खरेदी केले होते.
कपूर यांच्याकडून प्रियांका गांधी वढेरांनी दोन कोटी रुपयांचे पैसे चेकद्वारे घेतले होते आणि त्यांच्या प्राप्तिकर परताव्यामध्येही हे दिसून आले आहे. त्यामुळे हा व्यवहार पारदर्शी असल्याचे कॉंग्रेसने स्पष्ट केले आहे. मात्र हे चित्र त्यांच्या मालकीचे होते का, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या (एआयसीसी) मालकीचे होते याची चौकशी “ईडी’ करीत आहे.
एमएफ हुसेन यांचे चित्रकलेच्या जगात जे स्थान होते, तेच स्थान भ्रष्टाचाराच्या जगात कॉंग्रेसचे आहे. जर भ्रष्टाचार ही कला असेल तर कॉंग्रेसच त्याची कलावंत आहे, असे पात्रा म्हणाले.