मुंबई – मनी लॉन्डरिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले येस बॅंकेचे संस्थापक राणा कपूर यांना 11 मार्चपर्यंत सक्तवसुली संचलनालयाची कोठडी सुनावण्यात आली आहे. येस बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी राणा कपूर यांना आज दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास “ईडी’ने मनी लॉन्डरिंग प्रतिबंधक कायद्याच्या कलमांखाली अटक करण्यात आली. तपासामध्ये सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
येस बॅंकेतील कथित आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवस्थापनामुळे रिझर्व बॅंक आणि केंद्र सरकारने या बॅंकेचे व्यवहार हाती घेतले आणि राणा कपूर यांना काल अटक करण्यात आली होती. आज “ईडी’ने कपूर यांना अटक केल्यावर त्यांना सुटीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यानंतर त्यांना 11 मार्चपर्यंत “ईडी’ची कोठडी सुनावण्यात आली.
कपूर यांच्या कुटुंबीयांकडून चालवल्या जाणाऱ्या काही कंपन्यांची भूमिका तपासली जाणे आवश्यक आहे. या सर्वांची कपूर यांच्या समोर चौकशी व्हायला हवी, असे “ईडी’ने न्यायालयात सांगितले. मात्र कपूर हे तपासाला सहकार्य करत असून त्यांना “ईडी’कडून लक्ष्य केले जात असल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले. कपूर, त्यांची पत्नी आणि तीन मुलींकडून नियंत्रित केल्या जात असलेल्या एका फर्मला घोटाळ्यात अडकलेल्या दिवाण हाउसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) कडून मिळालेल्या 600 कोटी रुपयांच्या निधीसंदर्भात “ईडी’कडून चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.