लोणंद : लोणंद नगरपंचायतीचे विद्यमान उपनगराध्यक्ष किरण पवार यांच्यावर १२ नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे. या बारा नगरसेवकांच्या सह्यांचे पत्र नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्याकडे देण्यात आले आहे. यामुळे लोणंदसह खंडाळा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
लोणंद नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष किरण पवार हे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापतिपदावर काम करीत आहेत. आरोग्य समितीच्या गेल्या एक वर्षभरात एकही मीटिंग घेतली नाही. गोटे माळ याठिकाणी नगरपंचायतीच्या पाण्याच्या टाकी खाली गेली दीड वर्षे कचरा टाकला जातोय, त्याबाबत कोणतीही ठोस भूमिका सभापती यांनी घेतली नाही. कोणत्याही नगरसेवकांनी व नागरिकांनी सांगितलेल्या सूचना कल्पना यांच्याकडे डोळेझाक करून ते मनमानी कारभार करीत आहेत.
नागरिक जेव्हा आरोग्याच्या बाबतीत कचरा घंटागाडी बाबतीत समस्या नगरपंचायतीमध्ये घेऊन गेल्यानंतर उपनगराध्यक्ष केबिनमध्ये कधीच वेळेवर भेटत नव्हते. स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पाण्याच्या टाकी खालील कचरा उचलण्याचे टेंडर रद्द केले. त्यामुळे हा कचरा टाकीखाली पडून आहे, म्हणून वरील विषयांस अनुसरून उपनगराध्यक्ष इतर कोणत्याही नगरसेवकांना विश्वासात घेवून काम करत नसून मनमानी कारभार करत आहेत, असा आरोप करत काँग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बारा नगरसेवकांनी अविश्वास ठराव दाखल केला आहे.
या ठरावावरील नगरसेवक हणमंत विनायकराव शेळके, विकास लुमा केदारी, श्रीमती शैलजा बाबासाहेब खरात, सौ. हेमलता रमेश कर्णवर, राजेंद्र सिताराम डोईफोडे, सौ. कृष्णाबाई भिकु रासकर, सौ. स्वाती शरद भंडलकर, पुरूषोत्तम बाबुराव हिंगमिरे, लक्ष्मणराव सोपानराव शेळके, सौ. लिलाबाई विलास जाधव, योगेश उत्तमराव क्षीरसागर, सौ. दिपाली रविंद्र क्षीरसागर अशा बारा नगरसेवकांनी आपल्या सह्यांचे पत्र नगराध्यक्ष सचिन शेळके यांच्याकडे दिले आहे.