तरुणी व महिला बेजार, बंदोबस्त करण्याच्या मागणीला जोर
महाळुंगे इंगळे- चाकण शहरातील शाळा, महाविद्यालये व मोक्याच्या ठिकाणी रोडरोमिओंच्या त्रासामुळे तरुणी, महिला त्रस्त झाल्या आहेत. टवाळखोर तरूणांवर कारवाई करण्याची मागणी चाकणकर नागरिक करीत आहेत.
चाकण शहरातील शाळा, महाविद्यालये व चौकात टवाळखोर रोडरोमिओ तरुणांकडून रस्त्याने ये-जा करणाऱ्या तरुणी, महिलांकडे बघून अश्लील गाणी म्हणणे, शेरेबाजी करणे, दुचाकीवरून पाठलाग करून, शेजारून जोरात गाडी चालवत कर्कश हार्न वाजवणे, आदी त्रास होत आहे. अशा तक्रारी महिला व नागरिक करीत आहेत. श्री शिवाजी विद्यालय रस्ता, माणिक चौक, एसटी बसस्थानक, आंबेठाण रोड, शिक्रापूर रस्ता तसेच चौकातील पान टपऱ्यावर थांबून हे गुन्हेगारी प्रवृत्तीचे हे टवाळखोर रोडरोमिओ तरुणींना व महिलांना त्रास देत आहेत. शहरातील बहुतेक शाळा, कॉलेज व शिकवणीसाठी मुली जात असताना येण्या जाण्याच्या वेळेवर हे रोडरोमिओ रस्त्याच्या आडबाजूला दबा धरून बसतात. मुली दिसल्या की अचानक दुचाकीवरून जोराची गाडी दामटून कर्णकर्कश हॉर्न वाजवीत मुलींना त्रास देतात. हे गैरवर्तन करणाऱ्या रोडरोमिओंवर अंकुश ठेवण्यासाठी कुठलीही ठोस उपाययोजना कार्यान्वित नाही.
तरुणी अथवा महिला घरगुती खरेदीसाठी बाजारात जातानाही दुकानांजवळ किंवा जाणाऱ्या रस्त्याजवळील पान टपऱ्याजवळ उभे राहून हे टवाळखोर तरुणांकडून विचित्र शेरेबाजी केली जाते. गेल्या अनेक दिवसांपासून टवाळखोर तरुणांचा उपद्रव वाढला आहे. कॉलेज व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी, महाविद्यालयीन तरुणी व महिलांना रोडरोमिओंचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
चाकण शहरातील सर्वच चौकात अवैध प्रवासी वाहतूक करणारी वाहने आहेत. यावरील वाहनचालकांकडून वाहनातून प्रवास करणाऱ्या मुली व महिलांना नाहक त्रास दिला जात आहे. चाकण भागात कारखाने दिवसेंदिवस वाढत असल्याने देशाच्या कानाकोपऱ्यातून अनेक कुटुंबे या परिसरात वास्तव्यास आली आहेत.
या कुटुंबातील अनेक मुली, तरुणी व महिला शिक्षणांसाठी किंवा कंपनीत नोकरी करण्यासाठी घराबाहेर रोजच पडत असतात. टवाळखोर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत आहे, असे नागरिक सांगत आहेत. परंतु भीतीपोटी कोण कोणाकडे तक्रार करीत नाही, अशी कैफितय महिलांनी मांडली आहे.