नवी दिल्ली – नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात दिल्लीच्या फ्रेंड्स कॉलनीत 15 डिसेंबरला जो हिंसाचार झाला त्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले असून त्यात या दंगलीला प्रोत्साहन दिल्याबद्दल शारजील इमाम याच्या विरोधातही ठपका ठेवण्यात आला आहे. याच्या पुष्ट्यर्थ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज पुरावा म्हणून सादर केला आहे. कॉलचा तपशील तसेच शंभर साक्षीदारांचे जबाब पुरावे म्हणूनही सादर करण्यात आले आहेत. या आरोपत्रात जामियातील एकाही विद्यार्थ्याचा समावेश नाही.
मुख्य महानगर न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. शारजील इमाम याला गेल्या महिन्यातच देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली असून त्याला आज फ्रेंड्स कॉलनीतील हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांच्या कोठडीत एक दिवसासाठी पाठवण्यात आले आहे. फ्रेंड्स कॉलनीतील हिंसाचारात चार बसेस जाळण्यात आल्या तर पोलिसांच्याहीं दोन गाड्या जाळण्यात आल्या होत्या. तसेच तेथील हिंसक घटनांमध्ये 60 जण जखमी झाले होते. त्यात पोलिसांसह काहीं विद्यार्थ्यांचाही समावेश होता.