एकूण मृतांची संख्या 1900 वर
बिजींग – चीन मध्ये वुहान प्रांतात ज्या हॉस्पीटल मध्ये करोनाग्रस्त रूग्णांना दाखल करण्यात आले आहे त्या हॉस्पीटलच्या संचालकांचाहीं आज या रोगाने मृत्यू झाला. आता या रूग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाहीं या रोगाची मोठ्या प्रमाणात लागण झाल्याने आता चीन मधील वैद्यकीय कर्मचारीही धास्तावले आहेत. चीन मध्ये करोनाचे रोगाचे जे एकूण 72 हजार रूग्ण आहेत त्यात आरोग्य कर्मचाऱ्यांची संख्या 1716 इतकी आहे.
आत्तापर्यंत तेथे या रोगाने मरण पावणाऱ्यांची संख्या 1900 वर गेली असून त्यात सहा वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टरांचाहीं समावेश आहे. आज वुहान मधील वुचंग हॉस्पीटलचे जे संचालक करोना मुळे मरण पावले त्यांचे नाव लिऊ झिमींग असे आहे. हॉस्पीटल मध्ये त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी कसोशिचे प्रयत्न केले पण त्यात त्यांना यश आले नाही. त्यांच्या निधनामुळे चीन मधील करोना विरोधात कार्यरत असणाऱ्या आरोग्य कर्मचारी आणि अन्य कर्मचाऱ्यांमध्येही संतापाची लाट निर्माण झाली असून या रोगाच्या प्रसाराचे प्रकरण नीट हाताळण्यात सरकारला अपयश येत असल्याचा ठपका तेथील कर्मचाऱ्यांनी ठेवला आहे.