व्हिडीओ प्रसिद्ध होण्याबाबत विद्यापिठाने हात झटकले
नवी दिल्ली : जामिया मिलीया इस्लामिया विद्यापिठामध्ये पोलीस आणि निमलष्करी दलाने केलेल्या कारवाईचा एक व्हिडीओ आज सोशल मिडीयावर व्हायरल झाला. 15 डिसेंबरला झालेल्या या कारवाईदरम्यान पोलिसांनी विद्यापिठामध्ये डॉ. झाकीर हुसैन ग्रंथालयाच्या परिसरामध्ये ही कारवाई केल्याचे व्हिडीओत दिसते आहे.
विद्यापिठातील सीसीटिव्हीतील चित्रीकरणाचा या 48 सेकंदांच्या व्हिडीओमध्ये चेहरे झाकलेले गणवेशातील 7 ते 8 निमलष्करी दलाचे जवान आणि पोलीस जुन्या वाचनालयामध्ये घुसून विद्यार्थांना काठ्यांनी मारहाण करताना दिसत आहेत. मात्र हा व्हिडीओ विद्यापिठाने प्रसिद्ध केलेला नाही, असे विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी अहमद अझीम यांनी सांगितले.
पोलिसांनी 15 डिसेंबरला केलेल्या क्रूर कारवाईनंतर जामिया विद्यापिठातील विद्यार्थी आणि माजी विद्यार्थ्यांनी मिळून स्थापन केलेल्या जामिया समन्वय कमिटीने (जेसीसी) हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. विद्यापिठाच्या आवारात झालेल्या “सीएए’विरोधी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि जाळपोळीमध्ये विद्यापिठातील बाहेरच्यांचा सहभाग असल्याच्या संशयावरून पोलीसांनी 15 डिसेंबरला ही कारवाई केली होती.
जामिया समन्वय समितीकडून विद्यापिठाच्या 7 क्रमांकाच्या प्रवेशद्वाराबाहेर मौलाना अली जौहर रस्त्यावर “सीएए’विरोधी आंदोलन केले जात आहे. मात्र ही संघटना विद्यापिठाची अधिकृत संघटना नाही. त्यामुळे “जेसीसी’शी झालेला कोणताही संवाद अधिकृतपण विद्यापिठाबरोबरचा संवाद समजला जाऊ नये, असे जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.
जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठाचे नाव वापरून अनेक ट्विटर अकाउंट, फेसबुक पेज आणि अन्य सोशल मिडीयावर मजकूर प्रसिद्ध केला जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होत आहेत, अशा अनधिकृत सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवू नये, असेही त्यांनी सांगितले.