खेड-शिवापूर टोलनाका : स्थानिकांना मिळणार सवलत
जिल्हाधिकाऱ्यांच्या “एनएचएआय’ आणि रिलायन्स कंपनीला सूचना
येत्या रविवारी सर्वपक्षीय आंदोलनाचा इशारा मात्र कायम
पुणे – पुणे-सातारा महामार्गावरील खेड-शिवापूर टोलनाक्यावर अतिरिक्त चार मार्गिका तयार कराव्यात. त्यावरून सर्व वाहने जलद सोडावीत. फास्ट टॅगमध्ये स्थानिक नागरिकांना 25 टक्के सूट द्यावी. भोर व वेल्हा तालुक्यातील स्थानिक नागरिकांना ओळखपत्र दाखवल्यास टोलनाक्यावर सवलत द्यावी. तसेच टोलनाका कृती समितीने टोल नाका हटवण्याची मागणी योग्य निर्णयासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या मुंबई येथील कार्यालयात पाठवावी, अशा सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी महामार्ग प्राधिकरण आणि रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचर कंपनीला दिल्या आहे.
खेड-शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने हा टोलनाका पीएमआरडीएच्या हद्दीबाहेर हलवण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी येत्या रविवारी सर्वपक्षीय आंदोलन करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राम यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठक झाली. या बैठकीस ग्रामीण पोलिस अधिक्षक, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, रिलायन्स इन्फ्रास्ट्रकचर कंपनी, पीएमआरडीएचे अधिकारी, भोरचे उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार उपस्थित होते.
या बैठकीत टोलवर कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी टोल नाका संनियंत्रण समिती तयार करून त्याची बैठक दरमहा घेणे. स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केले जाणारे प्रश्न महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयकडे कार्यवाहीसाठी तत्काळ पाठवणे, टोलनाक्यावर वाहने जलद गतीने सोडण्यासाठी सुट्टीच्या दिवसासह प्रत्येक मार्गिकेत पुरेसे मनुष्यबळ वाढवावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राम यांनी यावेळी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच टोल नाक्यावर फास्टॅग यंत्रणा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी व जलद गतीने होण्यासाठी इंटरनेट सुविधा सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
प्रलंबित कामे पूर्ण करणार
खेड-शिवापूर टोल नाका व महामार्गावरील प्रलंबित 95 टक्के कामे पूर्ण झाल्याचे महामार्ग प्राधिकरणाकडून या बैठकीत सांगण्यात आले. उर्वरित 5 टक्के प्रलंबित कामांची यादी व ती पूर्ण करण्याचे वेळापत्रक सादर करण्यात येईल. सर्व प्रलंबित कामे 31 मार्चपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.