जल व भू प्रदूषणाबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाहणी ः दोषींवर होणार कारवाई
तळेगाव ढमढेरे/शिक्रापूर – येथील आणि शिक्रापूर परिसरातील औद्योगिक वसाहत, गृहसोसायटी व शेतजमिनीचे प्लॉटिंग पाडून निर्माण केलेल्या लोकवस्ती यांच्या सांडपाण्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न करता ओढे, नाले व प्रामुख्याने वेळ नदीमध्ये सोडल्याने पाणी प्रदूषण होत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केल्यानंतर संबंधित विभागाचे अधिकारी या गावाला भेट देण्यासाठी आले.
बेकायदेशीररीत्या कंपनी आणि गृहप्रकल्प सोसायटीच्या कोणत्याही प्रकारची पाण्यावर आणि कचऱ्यावर विनाप्रक्रिया वेळनदी पत्रात सोडले जात असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते सतीश ढमढेरे यांनी केली होती. प्रामुख्याने वेळ नदीमध्ये सोडल्याने पाणी प्रदूषण होत असल्याचे वृत्त दैनिक प्रभातने प्रसिद्ध केले. त्याच पार्श्वभूमीवर प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या गैरप्रकाराची पाहणी करून पंचनामा केला आहे.
दरम्यान याबाबत पुणे प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी दत्तात्रय गवळी यांनी तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर येथील जल व दूषित भूप्रदूषणाची पाहणी करून पंचनामा केला आहे. वेळ नदी व नदीला मिळणारा मुरळ ओढा आणि गटारीतून सोडलेलं पाणी, रस्त्याच्या कडेला उघड्यावर असलेला कचरा डेपो याची पाहणी केली. यावेळी तक्रारदार सतीश ढमढेरे, ग्रामसेवक एस. एस. खेडकर व शिक्रापूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवक जी. बी. नवले त्याचबरोबर जेष्ठ नागरिक श्रीकांत ढमढेरे यांच्या उपस्थितीत पाहणी आणि पंचनामा तयार केला असल्याचे गवळी यांनी सांगितले. या गावाची जलप्रदूषण आणि कचऱ्यापासुन सुटका होणार का? याकडे येथील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
सन 2011च्या जनगणनेनुसार गावची लोकसंख्या 15 हजार 393 असल्याचे तळेगाव ढमढेरे येथील ग्रामविकास अधिकारी एस. एस खेडकर यांनी सांगितले; परंतु वास्तविक या गावाची लोकसंख्या अंदाजे 25 ते 30 हजारांच्या पुढे लोकसंख्या असून येथील गृहप्रकल्प सोसायट्या आणि औद्योगिक कंपन्या दूषित पाणी वेळ नदीपात्रात सोडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. गावातून दररोज अंदाजे 1 टन कचरा निर्मिती होत असून वर्गीकरण करता वेळ नदीच्या पात्रात टाकले जाते.
तळेगाव ढमढेरे व शिक्रापूर गावचे तसेच दोन्ही गावांच्या वाड्या वस्त्या आणि मोठमोठ्या गृह प्रकल्पांचे सांडपाणी हे वेळ नदीमध्ये कोणत्याही प्रकारची प्रक्रिया न करता सोडले जाते. त्यामुळे पाणी हिरवट व काळपट पडले असून त्यातून उग्र वास येत असल्याचे जाणवले. तळेगाव ढमढेरे येथील कचरा डेपो जवळ तसेच मूरळ ओढ्यातील पाण्याचा देखील उग्र वास येत आहे.
दरम्यान शिक्रापूर व तळेगाव ढमढेरे गावातून येणारे सांडपाणी, मुरळ ओढ्याचे पाणी व वेळ नदीच्या पाण्याचे नमुने प्रयोगशाळा पृथकरण करण्यासाठी गोळा करून पाठवण्यात आले. पाहणी अहवाल व प्रयोगशाळेच्या नमुना अहवालाचा अभ्यास करून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ अधिकारी दोषींवर योग्य ती कारवाई करतील.
-दत्तात्रय गवळी, क्षेत्रीय अधिकारी प्रदूषण नियंत्रण मंडळ
घनकचरा प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबविणे गरजचे आहे. त्यासाठी शासन धोरणानुसार सीएसआर फंडातून स्वच्छेतेसाठी अग्रक्रमाने खर्च केल्यास कायमस्वरुपी प्रश्न मिटेल त्यासाठी कंपन्या व ग्रामपंचायत यांनी एकत्रित चर्चा करून यात लक्ष घातल्यास तात्काळ प्रश्न सुटण्यास मदत होईल.
-श्रीकांत ढमढेरे, तळेगाव ढमढेरे.