आंतरराज्यीय रॅकेट उघड झाल्यानंतर सर्वसामान्यांना नाहक मनस्ताप
पिंपरी – कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यावर कर्ज काढून गाडी विकत घेतली. चोरीची गाडी आहे, असे सांगून पोलिस गाडी घेऊन गेले. मात्र गाडीसाठी घेतलेल्या कर्जाचे काय, असा प्रश्न गाडी विकत घेतलेल्या नागरिकांना पडला आहे.
वाहनचोरांच्या आंतरराज्यीय रॅकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश करत चोरीच्या 12 गाड्या जप्त केल्या. परंतु या गाड्या चोरांनी चेसीस नंबर बदलून विकल्या होत्या. सर्वसामान्यांनी बॅंकेकडून अधिकृत रित्या कर्ज घेऊन ही वाहने विकत घेतली होती. वाहन नव्हे तर कर्ज विकत घेतले असल्याची भावना फसवणूक झालेल्या नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विमा कंपनीकडून अपघातग्रस्त भंगारातील वाहन चोरटे कागदपत्रासह खरेदी करीत असे. खरेदी केलेल्या वाहनाच्या रंगाची आणि मॉडेलचे वाहन इतर राज्यातून चोरत असत. चोरलेल्या वाहनाला अपघातग्रस्त वाहनाचा चेसी क्रमांक टाकून त्या वाहनाची विक्री नागरिकांना करीत असे. कागदपत्र असल्याने बॅंकाही या वाहनांवर कर्ज देत असत. या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने नुकतीच अटक केली. चोरट्यांनी विकलेल्या मोटारी चोरीच्या असल्याने पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.
कोंढव्यामध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीने मुलाच्या हट्टापायी सेकंडहॅन्ड इनोव्हा मोटार विकत घेतली. त्यासाठी बॅंकेकडून सहा लाख रुपयांचे कर्जही घेतले. मात्र पोलिसांनी ती जप्त केली. पोलिसांना सर्व कागदपत्रे दाखविली व या कायदेशीर कागदपत्रांवर कर्जही घेतल्याचे सांगितले. परंतु विकत घेतलेल्या गाडीला चोरट्यांनी भंगारातील गाडीला चॅसी नंबर टाकून विकली असल्याचे पोलिसांनी दाखवून दिले व ती गाडी जप्त केली. मात्र आता कर्जाचे काय, असा प्रश्न वाहनमालका समोर निर्माण झाला आहे. कर्जाचे हप्ते भरले नाहीत तर आपला ट्रॅक रेकॉर्ड खराब होईल आणि यापुढे कोणतीही बॅक कर्ज देणार नाही.
एका व्यावसायिकानेही अशाच प्रकारे मोटार विकत घेतली होती. पोलिसांनीही त्यांना गाडी चोरीची असल्याचे समजावून गाडी जप्त केली. विकत घेतलेली मोटार चोरीची होती आणि पोलीस घेऊन गेले, हे वडिलांना कसे सांगायचे, असा प्रश्न व्यावसायिकाला पडला आहे. यामुळे त्यांनी मित्र गाडी घेऊन गेल्याचे तात्पुरते वडिलांना सांगितले. ज्यांची वाहने चोरीला गेली आहेत, त्यांना पोलिसांनी वाहन मिळाल्याचे कळविल्यावर ते मात्र खुश होत आहेत. गाडीचा फोटो पाठविण्याची विनंती पोलिसांना करत आहेत.