केंद्रीय अर्थसंकल्पातून ठेंगा : गतवर्षीच्या 10 कोटींवरच बोळवण
पुणे -केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्प मांडण्यात आला. त्यामध्ये पुणे विभागाकरिता नेमके काय मिळाले, याचा उलगडा झाला नव्हता. मात्र, बुधवारी रेल्वे प्रशासनाकडून “पिंक बुक’ प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात पुणे-नाशिक नव्या लोहमार्गाचा जुना विषय पुन्हा चर्चेत आला असून 1212 कोटी रुपयांच्या प्रकल्पाकरिता गतवर्षी केवळ 10 कोटी रुपये पुणे विभागाला वर्ग करण्यात आले. यंदा निधीची गाडी काही पुढे ढकलली नाही, त्यामुळे हा प्रकल्प पुन्हा एकदा रखडणार आहे.
लालूप्रसाद यादव रेल्वे मंत्री असताना, पंधरा वर्षांपूर्वी प्रथमच पुणे-नाशिक रेल्वे मार्गाच्या सर्व्हेसाठी रेल्वे अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर दोनवेळा रेल्वेच्या अर्थसंकल्पात या मार्गाचा समावेश करण्यात आला. मध्यंतरी 2018मध्ये या रेल्वेमार्गाशी संबंधित अहवाल पाठविण्यात आला आहे. या मार्गासाठी आतापर्यंत चार वेळा सर्व्हे करण्यात आला आहे. त्याचा अहवाल रेल्वे बोर्डाला पाठविण्यातही आला आहे. अवाढव्य खर्च, प्रकल्पासाठी जागा देण्यास विरोध यामुळे आतापर्यंत प्रकल्पात काहीही प्रगती झालेली नाही.
दरम्यान, पुणे-नाशिक थेट प्रवासासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. सध्या पुण्यातून रेल्वेने कल्याणला उतरुन किंवा दौंडमार्गे मनमाडला उतरून नाशिकला जावे लागते. त्यामध्ये अंतर, वेळ आणि पैसे अधिक लागत असल्याने प्रवासी रेल्वेच्या भानगडीत न पडता थेट एसटी किंवा खासगी बसने नाशिक गाठतात. त्यामुळे पुणे आणि नाशिकच्या प्रवाशांसाठी पुणे-नाशिक रेल्वेमार्ग उपयुक्त आहे.
अर्थसंकल्पात पुण्याला डावलले
पुण्याकरिता एकाही नव्या गाडीची भर पडलेली नाही. तसेच जुन्या प्रकल्पांना देखील पुरेसा निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. यामुळे, दर वर्षीप्रमाणेच यंदाही पुणेकरांना यंदाही डावलल्याचे दिसून येते. पुणे-लोणावळा लोहमार्गाच्या चौपदरीकरणाचा जुनाच विषय नव्याने चर्चिला गेला असून त्यासाठी 2126 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे; मात्र पुणे महापालिका व पिंपरी-चिंचवड महापालिका नियमाप्रमाणे त्यांना द्यावा लागणारा हिस्सा देत नसल्याने या प्रकल्पावर प्रश्नचिन्ह उभा राहिला आहे.
बारामती-लोणंदसाठी 100 कोटींची तरतूद
बारामती-लोणंद नव्या लोहमार्गासाठी 100 कोटींची तरतूद असून पुणे-मिरज-लोंडा, पुणे-दौंड मार्गांच्या विस्तारीकरणाचा देखील समावेश आहे. हडपसर टर्मिनन्सच्या कामाकरिता 24 कोटी मंजूर झाले असून त्यापैकी आतापर्यंत केवळ 10 कोटी रुपये रेल्वे मुख्यालयाकडून मिळाले आहेत.
पुणे विभागाकरिता तरतूद
पुणे स्थानकातील प्लॅटफॉर्मची लांबी वाढविण्यासाठी 38 कोटींची तरतूद, त्यापैकी केवळ 3 कोटी रुपये मिळाले
दौंड कॉर्ड लाइनसाठी तरतूद असलेले 19 कोटी रुपये पुणे विभागाकडे वर्ग रेल्वे गेट क्रॉसिंगसाठी 12 कोटींची तरतूद, 4 कोटी पुणे विभागाकडे वर्ग प्रवासी सुविधांसाठी 2 कोटींची तरतूद