उल्हासनगरला कापडाचे दुकान असल्याचा बनाव
नगर – उल्हासनगरला आपले कपड्याचे होलसेल दुकान असल्याचा बनाव करून मुकुंदनगरच्या व्यापाऱ्यास 1 लाख 98 हजार 870 रुपयांना गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दानीश शमशूल शेख (वय 25 रा. मुकुंदनगर) यांनी भिंगार कॅम्प पोलिसांत फिर्याद दिली आहे. सागर केसवाणी असे आरोपीचे नाव असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
शेख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, केसवाणी याने उल्हासनगरला अपले धिराग अपसेल्स नावाचे कापड्याचे होलसेल दुकान असल्याचे सांगितले. तसेच त्याने व्हॉटस्ऍपद्वारे कपड्यांचे वेगवेगळे फोटो, व्हिजीटींग कार्ड, जीएसटी क्रमांक, बॅंक खाते क्रमांक असलेला धनादेश असे फोटो पाठविले होते. त्यावर विश्वास ठेवून 1 लाख 98 हजार 870 रुपयांचा धनादेश त्याला पाठविला होता. धनादेश पाठविल्यानंतर त्याचा मोबाइल नंबर बंद झाला.
उल्हासनगरला जावून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता त्याने सांगितलेले कापडाचे दुकान दुसऱ्याच्या मालकीचे असल्याचे आढळून आले. त्यामुळे केसवाणी याने आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. तसेच त्याने अनेक लोकांना अशाच पद्धतीने फसविल्याचे सांगण्यात आले. ही घटना 3 सप्टेंबर 2019 ते 28 नोव्हेंबर 2019 या दरम्यान घडली. शेख यांनी याबाबत पोलिसात फिर्यादी दिली आहे. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी केसवाणी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक शिंदे करीत आहे.