चिंबळी -पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय सुरू होऊन आता दीड-दोन वर्षे होत आले तरी कार्यपद्धती मात्र, प्रभावी नाही. आयुक्तालय असणाऱ्या आळंदी पोलीस ठाण्याचा या अगोदर असलेला ग्रामीण बाज देखील कार्यपद्धतीवरून तसाच सुरू आहे की काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
हा प्रश्न आता पडण्याचे कारण की, न्यायालयाने रात्री दहापर्यंतच लाईडस्पीकर, भोंग्यांना परवानगी दिली असताना आळंदी पोलीस ठाण्याच्या 11 गावांमध्ये मात्र मध्यरात्री दोन ते तीनपर्यंत बिनदिक्कतपणे देवीची गाणी, भजने, जागरण गोंधळ मोठ्या कर्णकर्कश्श आवाजात सुरू असतात. त्यांचा आवाज मोठा असल्याने नागरिकांच्या झोपेचे खोबरे होत आहे. विद्यार्थ्यांचे यात मोठे नुकसान होत आहे तर नोकरदार वर्गाची झोप अपुरी होत असल्याने कंपनीत झोप येत आहे.
आळंदी पोलिसांची राऊंडची गाडी फक्त अशा कार्यक्रम ठिकाणी आवाज कमी करण्याची विनंती करीत असते पोलीस गेल्यानंतर मात्र आवाज पुन्हा जोरात केला जातो, ही वस्तुस्थिती आहे. पोलीस देखील धार्मिक कार्यक्रम असल्याने स्पीकरचा आवाज बंद करण्याच्या भानगडीत पडत नाहीत. आळंदी पोलीस ठाण्याला फोन केल्यास तक्रार घेतल्यानंतर नाव विचारले जाते, नाव न सांगितल्यास ती तक्रार ग्राह्य धरली जात नाही.
सार्वजनिक ठिकाणी चुकीचे काही घडत असेल तर त्याची तक्रार केल्यास त्यात तक्रारदाराचे नाव आवश्यकच असते का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत. तक्रारदराने नाव सांगितल्यास पोलीस देखील कार्यक्रम चालू असलेल्या ठिकाणी जाऊन आमक्या-आमक्याची तक्रार असल्याचे सांगतात, यामुळे तक्रारदारावर सर्वांचा रोष ओढवतो. यामुळे आपल्या अंगावर रोष नको म्हणून कोणीच तक्रार न करता निमूटपणे बेसूर व कर्णकर्कश्श आवाज रात्रभर ऐकत झोपण्याचा प्रयत्न करतात.
रात्रभर भोंगी वाजणारी गावे आळंदी शहर, चिंबळी, केळगाव, सोळु, चऱ्होली खुर्द, गोलेगाव, पिंपळगाव, धानोरे, मरकळ, कोयाळी, वडगाव घेनंद आदी गावांमध्ये रात्रभर बिनदिक्कत लाऊड स्पीकर मोठ्या आवाजात कर्णकर्कश्श भोंगे सुरू असतात.
लाऊड स्पीकरच जप्त करणार
पोलीस या भागातील लाऊड स्पीकर व्यावसायिकांना नोटिसा देणार आहेत. यात रात्री दहा नंतर स्पीकर वाजवल्यास त्यावर दंडात्मक कारवाई व साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जाणार असून व्यावसायिकांना वेळेची शिस्त लावल्यास आवाजावर मर्यादा येतील.लवकरच व्यावसायिकांना याबाबत कडक सूचना देणार असल्याचे आळंदी पोलीस ठाण्यामधील एका पोलीस अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितले.