तालुक्यातील बचतगटांना मिळाले प्रथमच व्यासपीठ
जामखेड – ग्रीकल्चरल डेव्ललपमेंट ट्रस्ट बारामती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि सामाजिक संस्थेच्या मदतीतून आयोजित करण्यात आलेल्या पुणे येथील 14 व्या भीमथडी जत्रेला कर्जत व जामखेड तालुक्यातील महिला बचत गटांना मोठा प्रतिसाद मिळाला. कर्जत-जामखेड तालुक्यातील सुमारे 25 बचतगटांना भीमथडी यात्रेत मोफत प्रवेश देण्यात आला होता.
त्यामध्ये चप्पल, गोधडी, मसाले, शिपी आमटी, शाकाहारी, मांसाहारी, भाजी भाकरी, कडधान्य, लाकडी खेळणी, पेन्सिल आदी उत्पादन प्रकार सादर केले होते. तालुक्यातील या बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तुची तब्बल 20 लाख 3 हजार रुपयांची विक्री झाल्याने महिलांच्या व्यावसायिक दृष्टीकोण बदलला आहे. ग्रामीण भागात बचत गटांना प्रोत्साहन देऊन त्यांच्या माध्यमातून विविध व्यवसाय व उद्योगांना चालना देणारी भीमथडीची संकल्पना कर्जत-जामखेडच्या बचत गटांना संजीवनी देणारी ठरली आहे.
वेगवेगळ्या भागात सामाजिक हेतुने महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था, ग्रामीण भागातील गरजू, गरीब बचत गटांना संधी देत, अपंग व नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या कलाकारांना घेऊन ही भीमथडी जत्रा नुकतीच संपन्न झाली. निष्ठा, सेवा, श्रद्धा, कला, संस्कृती आणि अध्यात्म याचे दर्शन व्हावे या उद्देशाने पंढरीच्या वारीची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.
या प्रदर्शनास माजी कृषीमंत्री शरद पवार, भीमथडीच्या आयोजक सुनंदा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार रोहित पवार, राजेंद्र पवार, कर्जत तालुका समन्वयक विजय दिवटे, जामखेड तालुका समन्वयक अमोल घुले, तालुक्यातील बचत गटांचे महिला, पदाधिकारी आदी उपस्थित होते.
राणी झेलकर यांना उकृष्ट नियोजन पुरस्कार
भीमथडी जत्रेत कर्जत तालुक्यातील सखी महिला बचत गटाच्या राणी झेलकर यांनी कर्जतच्या प्रसिद्ध असलेल्या शिपी आमटीचा स्टॉल लावला होता. या स्टॉलवर त्यांच्या बचत गटाने 1 लाख 64 हजार रुपयांची उच्चांकी विक्री केली. त्यांनी केलेल्या गटाच्या उत्कृष्ट कामाबद्दल आमदार रोहित पवार यांच्या हस्ते त्यांना उत्कृष्ट नियोजन पुरस्कार देण्यात आला.