सासवड-सासवड (ता. पुरंदर) शहरातून जाणाऱ्या सासवड – जेजुरी पालखी महामार्गावर कार आणि ट्रकच्या अपघातात प्रसिद्ध क्रीडा प्रशिक्षक गजानन पाटील (वय 55) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. 18) सकाळी 11.45 वाजता ही घटना घडली.
क्रिडा प्रशिक्षक गजानन पाटील हे स्विफ्ट कार (एमएच 12 एनजे 5730) स्वतः चालवित पुण्याहून जेजुरीकडे जात असताना सासवड शहरातील धुमाळ पेट्रोल पंपासमोर ओव्हरटेक करताना दुसऱ्या बाजूने पुण्याकडे जाणाऱ्या मालवाहू ट्रक क्रमांक (एमएच 12 आरएन 3210) ची धडक झाली. यामध्ये गजानन पाटील हे गाडीतून बाहेर फेकले गेल्याने कारच्या समोरच्या काचेवर आदळले यात त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना बेशुद्धावस्थेत सासवड येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील ससून रुग्णालयात नेण्यात आले. ससून रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.