प्रा. अजित अभ्यंकर यांचा आरोप; कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर समाज प्रबोधन केंद्राची स्थापना
सातारा – सध्या देशामध्ये तथाकथित स्पर्धेच्या नावाखाली क्रोनी भांडवलशाही, दलाल भांडवलशाही राबवली जात असल्याचे जेष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते व विचारवंत प्रा. अजित अभ्यंकर (पुणे) यांनी म्हटले आहे. सातारा येथील ज्येष्ठ मार्क्सवादी नेते स्मृतीशेष कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे कार्य व विचार पुढे नेण्यासाठी सातारा येथे कॉम्रेड प्रभाकर महाबळेश्वरकर समाज प्रबोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. त्याचे उद्घाटन प्रा. अजित अभ्यंकर यांचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी अभ्यंकर भारतीय अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने या विषयावर बोलत होते. विचारमंचावर कॉ. अंजली महाबळेश्वरकर, कॉ. वसंत नलावडे , उपस्थित होते.
भारतीय अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरठ्यावर यायला मागणीचा अभाव हे कारण असून मागणी वाढवण्यासाठी जनतेच्या क्रयशक्तीमध्ये वाढ करणे हा योग्य उपाय असल्याचे सांगून प्रा. अजित अभ्यंकर म्हणाले, पण सरकार कार्पोरेट व संपत्ती करात कपात करुन उत्पादन वाढीचे चुकीचे प्रयत्न करत आहे. अशा उपायांनी सरकारी उत्पन्नात घट होवून राजकोषीय तुट वाढत आहे.
सरकारी उत्पन्नात कर्जाचा मोठा वाटा आहे. पण त्यापैकी बहुतांश हिस्सा हा व्याज फेडण्यासाठी खर्च होतो. भारतातील मनुष्यबळाचा योग्य वापर केला आणि कर व जीडीपी यांचे प्रमाण वाढवले तर भारत एक संपन्न देश होवू शकतो असेही प्रा. अजित अभ्यंकर म्हणाले. यावेळी कॉ. अंजली महाबळेश्वरकर यांचेही भाषण झाले. प्रारंभी प्रा. कॉ. प्रभाकर महाबळेश्वरकर यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कॉ. वसंत नलावडे यांनी प्रास्ताविक केले. विजय मांडके यांनी सूत्रसंचालन करुन आभार मानले.
यावेळी कॉ. अंजली महाबळेश्वरकर यांनी सातारा तालुक्यातील कुसवडे येथील विजय मांडके सार्वजनिक ग्रंथालयाला एक लाख रुपयांच्या देणगीचा धनादेश दिला. हा धनादेश ग्रंथालयाचे पदाधिकारी महेश गुरव, लखन जगताप, बल्लाळ सर व इतरांनी अभ्यंकर यांचे हस्ते स्विकारला. कार्यक्रमास डॉ. दत्तप्रसाद दाभोलकर, प्राचार्य पुरुषोत्तम शेठ, किशोर बेडकीहाळ, मिनाज सय्यद, सलिम आतार, डॉ. रवींद्र भारती, दिनकर झिंब्रे, प्रा. आर. वाय. जाधव, प्रा. हिंदुराव पवार, भाऊ जंगम, त्र्यंबक ननावरे, युवराज जाधव, रोहित क्षीरसागर, उमेश खंडूझोडे, प्रा. दत्ताजीराव जाधव, प्रा. संजीव बोंडे, ऍड. राजेंद्र गलांडे आदींसह अनेकजण उपस्थित होते.