बॉम्बे रेस्टॉरंट चौकात सिग्नल यंत्रणेची मागणी

कृष्णानगर – सातारा शहराच्या पूर्वेकडे गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेला बॉम्बे रेस्टॉरंट चौक हा सध्या पुणे- कोल्हापूर महामार्गावरील दुचाकी व चारचाकी वाहनांच्या वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक चौक झाला आहे. वाढती दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या, बेशिस्त वाहनचालक व पादचारी यांच्यामुळे हा चौक सध्या अनेकांच्या दृष्टीने मृत्यूचा सापळा बनला आहे.

सातारा शहराला जोडणाऱ्या या महामार्ग व सेवा रस्त्यावर सध्या वाहतुकीचा प्रचंड ताण वाढला आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांची वाढती संख्या, कोरेगाव व सातारा शहराच्या बाजूस असणाऱ्या रस्त्यांवरील रिक्षा व खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या काळ्या-पिवळ्या जीपचे थांबे व या चौकात दिवसेंदिवस होत असलेली लहान-मोठी अतिक्रमणे या सर्व बाबीमुळे या चौकात दररोज दिवसभरात अनेक वेळा सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते.

त्यामुळे विसावा नाका, कृष्णानगर, संगम माहुली, देगाव फाटा या शहराच्या विविध भागांतून शहरात ये- जा करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहन चालकांच्या बरोबरच या भागातील नागरिकांना, पादचाऱ्यांना, विशेषतः महिला, वृद्ध व शाळकरी मुलांना या वाहतूक कोंडीला सातत्याने सामोरे जावे लागते. या सततच्या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांच्यासह नागरिक अक्षरशः वैतागून गेले आहेत.

अलीकडे या चौकात वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस व होमगार्डची नेमणूक करण्यात आली आहे. तरीसुद्धा पुसेगाव, कोरेगाव, पुणे, वाढे फाटा, कराड, सातारा शहर या विविध मार्गावरून येणाऱ्या वाहनांची संख्या भरमसाठ असल्यामुळे व बेशिस्त वाहन चालकांच्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिसांना वाहतूक नियंत्रण करणे जिकरीचे होऊन बसले आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी या चौकात सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करण्याची मागणी पादचारी व वाहन चालकांकडून होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.