जूनपर्यंत 10.84 टीएमसी पाणीकोटा मंजूर, पण अधिकार काढले
पुणे – खडकवासला धरणातून पाणी घेण्याची पुणे महानगरपालिकेची स्वतंत्र यंत्रणा (पंप हाउस, जॅकवेल, ग्रॉव्हीटी वॅल) असल्यामुळे महापालिकेच्या पाणीवापरावर जलसंपदा विभागामार्फत नियंत्रण ठेवता येत नाही. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने पाणी घेण्याची ही यंत्रणा खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या ताब्यात देण्यात यावी, असे आदेश जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता यांनी दिले आहेत. त्यातून पालिकेचे पंख कापण्यात आल्याचे बोलले जात आहे.
2019-20 साठी पुणे महानगरपालिकेला पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. हा कोटा मंजूर करतानाचा पाणी उपसा करण्याची यंत्रणा जलसंपदा विभागाकडे देण्याची अट ठेवली आहे.
महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेला पाणी वापराचे अंदाजपत्रक (वॉटर बजेट) विहित नमुन्यात लोकसंख्या प्रमाणित करून सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पुणे महानगरपालिकेने जलसंपदा विभागाकडे पाण्याचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये पुणे शहराची लोकसंख्या 58 लाख 6 हजार 723 इतकी असल्याचे आयुक्तांनी म्हटले आहे.
महानगरपालिकेने गृहित धरलेल्या लोकसंख्येसाठी आवश्यक ते पुरावे सादर केलेले नसून महापालिका आयुक्तांनी ही लोकसंख्या प्रमाणित केलेली आहे. यानुसार शहराचा पाणी कोटा मंजूर करण्यात आला आहे.
पुणे महानगरपालिकेचे वार्षिक पाण्याचे अंदाजपत्रक सादर करताना मनपा हद्दीतील या संस्थांची लोकसंख्या समाविष्ट केली आहे. त्यामुळे पाणीकोटा 1.97 टीएएमसी पुणे महानगरपालिकेच्या मागणीतून कमी करण्यात येत असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
असे असेल पाण्याचे वाटप आणि आरक्षण
लोकसंख्येनुसार शहराला दररोज 81 कोटी 33 लाख 56 हजार 360 लिटर म्हणजे 840 एमएलडी इतक्या पाण्याची आवश्यकता आहे. यानुसार जलसंपदा विभागाने पुणे महानगरपालिकेला 30 जून 2020 पर्यंत 10.84 टीएमसी इतक्या पाण्याचा कोटा मंजूर केला आहे. महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीत समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती तसेच पाणीपुरवठा योजनांसाठी 1.48 टीएमसी पिण्यासाठी पाणी मंजूर आहे. तसेच मनपा हद्दीत समाविष्ट असलेल्या 18 संस्थांना जलसंपदा विभागामार्फत पिण्यासाठी तसेच औद्योगिक कारणासाठी सुमारे अर्धा टीएमसी पाणी आरक्षण आहे. यानुसार मनपा हद्दीतील पाणीपुरवठा योजनांसाठी व इतर संस्थांसाठी एकूण 1.97 टीएमसी पाणी आरक्षण मंजूर आहे. या संस्थांना जलसंपदा विभागामार्फत नवीन मुठा उजवा कालव्यामध्ये धरणातून पाणी सोडून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.
पाणी कोटा मंजूर करताना जलसंपदा विभागाकडून अटी
पाणी कोटा मंजूर करताना जलसंपदा विभागाकडून अटी घालण्यात आल्या आहेत. यामध्ये पाणी वापराच्या मर्यादेतच वार्षिक पाणी वापर करणे बंधनकारक राहणार आहे. या मर्यादेपेक्षा जादा पाणी वापरल्यास व त्यामुळे उन्हाळ्यात पिण्यासाठी व सिंचनासाठी टंचाई परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसेच न्यायालयीन प्रकरणे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे पुणे महानगरपालिकेने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने विहित मापदंडाच्या मर्यादेमध्ये पाणी वापर ठेवणे आवश्यक राहणार असल्याचे पुणे पाटबंधारे मंडळाचे सहायक अधीक्षक अभियंता यो.स.भंडलकर यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे.