स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; “सूर्या’ श्वानाची कामगिरी मोलाची
वाठारस्टेशन / सातारा (प्रतिनिधी) – कवडेवाडी (हिवरे), ता. कोरेगाव परिसरातील महादेव डोंगरात परराज्यातील काही युवक फिरत असून त्यांच्याकडे गावठी बॉम्ब असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा, बॉम्बशोधक व नाशक पथकाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करून मनिबबे सुपरचंद राजपूत (रा. कवडेवाडी, मूळ रा. उत्तर प्रदेश) याला अटक केली आहे. पोलिसांनी चार तास मोहीम राबवत तेरा गावठी बॉम्ब शोधून काढले. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हे बॉम्ब निकामी केले. यामध्ये श्वान पथकाची कामगिरी मोलाची ठरली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कवडेवाडी (हिवरे), ता. कोरेगाव येथील महादेव डोंगरालगतच्या परिसरात परराज्यातील काही लोक फिरत असून त्यांच्याकडे बॉम्ब असल्याची माहिती पोलिसांना रविवारी सकाळी मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक आणि बॉम्बशोधक व नाशक पथकाने अतंत्य सावधपणे शोधमोहीम सुरू केली. या मोहिमेची संशयितांना काणकूण लागणार नाही आणि त्यांच्याकडून घातपात होणार नाही, याची दक्षता घेत पोलिसांनी डोंगरात तब्बल चार तास मोहीम राबवली. दरम्यान, डोंगरात बॉम्ब असल्याची माहिती मिळताच कवडेवाडी, हिवरे परिसरातील लोकांनी गर्दी केल्याने पोलिसांच्या कारवाईत काही वेळ अडथळा येत होता. पोलिसांनी लोकांना लांब थांबण्याचे आवाहन केले.
ही शोधमोहीम सुरू असताना काळीची खोटी नावाच्या शिवारात महानवर वस्तीजवळ एक संशयित दिसला. त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी झडती घेतली असता त्याच्याकडे नऊ गावठी बॉम्ब सापडले. त्याशिवाय परिसरात आणखी चार गावठी बॉम्ब जमिनीत पुरल्याचे संशयिताने सांगितले. पोलिसांच्या “सूर्या’ या श्वानाने ते चार बॉम्ब शोधून काढले. हे बॉम्ब रानडुकरांची शिकार करण्यासाठी आणल्याची कबुली संशयिताने दिली. बॉम्बशोधक व नाशक पथकाने हे बॉम्ब निकामी केले. संशयिताला अटक करून वाठार स्टेशन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, मोहन नाचण, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, केतन शिंदे, धीरज महाडिक, वैभव शिंदे, बॉम्बशोधक व नाशक पथकातील किरण मोरे, रुपेश साळुंखे, अमोल गवळी, नीलेश दयाळ यांनी ही कारवाई केली.