300 हून अधिक जखमी
तेहरान -भूकंपाच्या जोरदार धक्क्याने शुक्रवारी इराणला हादरवले. त्यामुळे अनेक घरे कोसळून 5 जण मृत्युमुखी पडले, तर 300 हून अधिक जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
इराणच्या वायव्येकडील भागांना गुरूवारची मध्यरात्र उलटल्यानंतर शक्तिशाली भूकंपाने हादरवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर 5.9 इतकी नोंदली गेली. भूकंपाचा केंद्रबिंदू त्या देशाच्या पूर्व अझरबैजान प्रांतात जमिनीखाली 8 किलोमीटर अंतरावर होता. त्या भूकंपानंतर तब्बल 5 आफ्टरशॉक्स बसले. भूकंपामुळे 41 गावांमध्ये मोठी हानी झाली. तिथे सुमारे 40 घरे भुईसपाट झाली.
तर अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. भूकंपामुळे 200 हून अधिक जनावरे दगावली. त्या धक्क्यामुळे झालेल्या हानीची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू केले. इराण हा भूकंपप्रवण देश मानला जातो. त्या देशात आतापर्यंत अनेक विनाशकारी भूकंप झाले आहेत. इराणला 1990 मध्ये तब्बल 7.4 तीव्रतेचा भूकंपाचा हादरा बसला.
त्यामुळे 40 हजार लोक मृत्युमुखी पडले. त्या देशात 2003 मध्ये भूकंपाने 31 हजार जणांचा बळी घेतला. याआधी 2005 आणि 2012 मध्ये त्या देशात अनुक्रमे 600 आणि 300 लोक मृत्युमुखी पडले.