सराईत गुन्हेगाराचे कृत्य; कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे
बारामती- पोलीस ठाण्यात घुसून पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची सराईत गुन्हेगाराने धुलाई केल्याची घटना बारामती शहर पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.7) दुपारी घडली. पोलीस अधिकाऱ्यांवर हात उचलण्यापर्यंतची मजल गुन्हेगारांची गेल्यामुळे बारामती कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लाला आत्माराम पाथरकर (रा. आमराई, बारामती) याने पोलिसांना मारहाण केली आहे. या प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व पोलीस शिपाई गायकवाड हे दोघे जखमी झाले. पोलीस नाईक रामदास जाधव यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून लाला पाथरकर याच्या विरोधात सरकारी कामात अडथळा, सरकारी कर्मचाऱ्यांवर हात उचलणे आदी कलमांन्वये पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
लाला पाथरकर यांची पत्नी गोदावरी लाला पाथरकर (वय 30) ही गुरुवारी लाला पाथरकर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार देत होती. त्यावेळी रामदास जाधव हे ठाणे अंमलदार म्हणून कार्यरत होते. गोदावरी लाला पाथरकर पती लाला याने हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत आहे, असे ठाणे अंमलदारांना सांगत असतानाच लाला पाथरकर पोलीस ठाण्यात आला. त्याने पत्नीस मारहाण करण्यास सुरुवात केली. पोलिसांसमोर महिलेला मारहाण होत असल्याने पोलीस उपनिरीक्षक सुभाष मुंढे व शिपाई गायकवाड यांनी लाला पाथरकर याला आडवले तसेच पोलीस ठाण्याबाहेर काढले. लाला पाथरकर याने पोलीस अधिकारी मुंढे यांना अर्वाच्च भाषेत बोलून डाव्या कानावर तसेच उजव्या हाताच्या बोटावर मारहाण केली. मुंढे व गायकवाड यांनी त्यास बळाचा वापर करून पकडून ठेवले. तरीही त्याने घाणेरड्या भाषेत पोलिसांना शिवीगाळ केली.
मी स्वतःला काही तरी करून घेवून तुमच्या सर्वांना लावतो, अशी धमकीही त्याने देत सरकारी कामकाजात अडथळा आणल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक पद्मराज गंपले अधिक तपास करीत आहेत. पोलीस अधिकारी मुंडे यांच्या कानाला मार लागला असून त्यांना सिल्वर जुबली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यानंतर त्यांनी शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेतले. सराईत गुन्हेगारांसोबत स्नेहाचे संबंध पोलीसांच्या अंगलट आल्याची चर्चाही शहरात दिवसभर होती.