पुणे : नवरा बायको घरात चित्रपट पाहत असताना अचानक नवऱ्याला दुसरा चॅनेल बदलण्याची हुक्की आली. यामुळे नाराज झालेल्या बायकोने त्याच्यावर तोंडसुख घेतले. याचे रुपांतर पुढे भांडणात झाले. हे भांडण इतक्या टोकाला गेले की, नवऱ्याने बायकोला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, त्याने बायकोचा गळा दाबून तिच्या हाताला चावून तिला जखमी केले.
कात्रज रस्त्यावरील शिवशंभोनगर येथे ही घटना घडली.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यानुसार विठ्ठल ज्ञानदेव गरड (वय 30, रा. शिवशंभो नगर) याला अटक केली आहे. याप्रकरणी त्याची पत्नी विजयश्री विठ्ठल गरड (वय 30) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे घरात टिव्हीवर चित्रपट पहात होते. त्यावेळी आरोपीला अचानक ज्या चॅनेलवर चित्रपट लागला आहे तो बदलुन दुसरा चॅनेल पाहण्याची हुक्की आली. यासाठी त्यांनी बायकोकडे रिमोटची मागणी केली. यावर तिने “चांगला चित्रपट लागला आहे, तो पाहु द्या’ अशी विनंती केली. मात्र, या उत्तराचा राग आल्याने पतीने पत्नीस शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला दोघांमध्ये सुरू असणाऱ्या वादविवादाचे रुपांतर पुढे भांडणात झाले. नवरा बायकोच्या भांडणाचे पर्यावसान शेवटी मारहाणीत झाले.
राग अनावर झालेल्या पतीने पत्नीला रिमोट न दिल्याच्या कारणावरून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर पत्नीचा गळा दाबून तिच्या हाताला चावा घेत जखमी केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी हे करीत आहेत.