शिक्षणासाठी विद्यार्थ्यांचा जीव धोक्‍यात

वाल्हे परिसरात रेल्वे मार्ग ओलांडून बोगद्याच्या पाण्यातून प्रवास

वाल्हे- येथील सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडी, राख, गुळूंचे आदी गावांना जोडणारा मार्ग, तसेच परिसरामधील विद्यार्थ्यांना वाल्हे गावामध्ये पोचण्यासाठी, रेल्वे मार्गावरील बोगद्यामध्ये पाण्याचा साठा होत असल्याने, येथील विद्यार्थ्यांना, तसेच कामगार, ग्रामस्थ यांना जीव धोक्‍यात घालून, रेल्वे मार्ग ओलांडून पुढे जावे लागत आहे.

वाल्हे परिसरामध्ये परतीच्या पावसाने मागील तीन-चार दिवसांपासून उघडीप दिली असली, तरी सुकलवाडी फाट्यावर नव्याने रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या भुयारी मार्गामध्ये पाण्याचा साठा होत असल्याने परिसरामधील ग्रामस्थांना रेल्वे मार्ग ओलांडून यावे लागत आहे.

गेल्या वर्षी रेल्वे प्रशासनाकडून येथील रेल्वे गेटच्या भुयारी मार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याआधी काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे या कामाला कासवगतीच ग्रहण लागले होते. वाल्ह्यासह, सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडवाडी, तसेच गुळुंचे, कर्नलवाडी,राख आदी भागांना जोडणाऱ्या या रेल्वेच्या भुयारी मार्गावरून असंख्य प्रवासी, तसेच या भागातील शेतकऱ्यांसह, शालेय विध्यार्थी नेहमीच वर्दळ असते. रेल्वे प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे या मार्गाचे काम सध्या पूर्णतः रखडले असून, या कामाला ठिकठिकाणी तडे गेल्याने या भुयारी मार्गाची अवस्था दयनीय झाली आहे.

त्यातच पर्यायी रस्ता रेल्वे प्रशासनाकडून बंद करण्यात आला आहे. या मार्गावर साठलेल्या पाण्यातून दुचाकी, किंवा चारचाकी वाहन नेले असता गाडी मध्येच बंद पडल्याचे अनेक प्रसंग घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. याबाबत योग्य ती उपाययोजना लवकरात लवकर केली गेली नाही, तर साठलेल्या पाण्यामध्येच अंदोलन करण्यात येईल, असा इशारा सुकलवाडी, मुकदमवाडी, अंबाजीचीवाडी, गायकवाडी येथील ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

  • दोन दिवसांपूर्वी दुर्घटना टळली
    दोन दिवसांपूर्वीच विद्यार्थी शाळेतून घरी जाताना रेल्वे मार्ग ओलंडताना रेल्वे गाडी येत असल्याचे मुलांच्या लक्षात आले नव्हते, सुदैवाने जवळील प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर विद्यार्थ्यांना समोरून येत असलेली गाडी दिसल्याने, ते लगेच रेल्वे मार्गावरून बाजूला झाल्याने मोठी दुर्घटना टळल्याचे येथील प्रवाशांनी सांगितले, त्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित लक्ष केंद्रित करून भविष्यात या ठिकाणी पाणीसाठा होऊ नये, यासाठी योग्य ते नियोजन करावे, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.