2024 ला सम्राट बाबांना आमदार करण्याचा मेळाव्यात निर्धार
इस्लामपूर (प्रतिनिधी) – येत्या पाच वर्षांत कार्यरत राहून सामान्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करूया. अन् 2024 ला सम्राट बाबांना आमदार करूया असा निर्धार शिराळा मतदार संघातून निवडणूक लढवलेले अपक्ष उमेदवार सम्राट महाडिक यांच्या कार्यकर्त्यांनी केला. कोणत्याही पक्षाचा झेंडा हाती घ्या अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली. कार्यकर्त्यांचा सन्मान राखणाऱ्या राजकीय पक्षात योग्यवेळी प्रवेश करू असे सूतोवाच पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक यांनी केले.
कोणताही पक्ष व नेता पाठीशी नसताना महाडिक यांनी कार्यकर्त्यांच्या ताकदीवर मिळवलेली मते विजयापेक्षा कमी नाहीत. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून ताकद दाखवून देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
पेठ नाका येथील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित आभार मेळावा झाला. जेष्ठ नेते सी. बी. पाटील, पंचायत समितीचे गटनेते राहुल महाडिक, सम्राट महाडिक, दि.बा.पाटील, नगरसेवक सतीश महाडिक उपस्थित होते.
राहुल महाडिक म्हणाले, आम्ही काही गमावले नाही. तर लोकांना मिळवलं आहे. पराभूत झाल्याने आम्ही घरी बसणार नाही. लोकांची सेवा करणार आहोत. निवडणुकीच्या निमित्ताने बेरोजगारांना दिलेली आश्वासने पूर्ण करू. शेतीमाल प्रक्रिया उद्योग, हॉस्पिटल यासारख्या संस्थात्मक कार्यामध्ये गती घेऊ. राजकारण करायला कोणतातरी बॅनर घ्यावा लागेल. ही कार्यकर्त्यांची भावना रास्त आहे. याबाबत योग्य वेळी निर्णय घेऊ. सी. बी. पाटील म्हणाले, गेली पंचवीस वर्षे कोणाला तरी पाठिंबा देणे ही आमची चूक होती. निर्धाराने लढण्याची आवश्यकता होती. सम्राट बाबांनी चांगली लढत दिली. प्राप्त परिस्थिती पाहून पक्षीय निर्णय घेऊया.
सम्राट महाडिक म्हणाले, पराभूत होऊनसुद्धा आम्ही हरलेलो नाही. निवडणुकीच्या निमित्ताने आम्हाला फसलेल्या कार्यकर्त्यांचे पाच वर्षात परफेक्ट नियोजन करू. भाजपाचा उमेदवार त्यांच्या कर्तृत्वाने पडला. लोकांनी त्यांना लाथाडले आहे. ते मात्र पराभवाचे खापर आमच्यावर फोडत आहेत. निवडणुका झाल्या आता कार्यकर्त्यांशी संपर्क करीत शिराळा मतदार संघांमध्ये स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांच्या पाठीशी राहू.
जयसिंग शिंदे म्हणाले, पुढच्या निवडणुकीत सम्राट बाबाचं आमदार असतील. यासाठी जिद्द, उमेद, इर्षा, महत्वाकांक्षा ठेवावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाजनादेश यात्रेत दादांना व बाबांना आशीर्वाद मागितला. पण तिकीट मात्र नाकारले. महाडिक युवा शक्तीच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत शिराळा तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकित पराभवाचे उट्टे काढू.
अमित ओसवाल म्हणाले, राहुल व सम्राट या महाडिक बंधूंची राजकीय, सामाजिक, सहकार, शैक्षणिक क्षेत्रातील वाटचाल चढती आहे. महाडिक गटाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणात नेहमीच वरचष्मा राहिला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या पाठबळावर आम्हाला मिळालेले कास्यपदक विजयापेक्षा कमी नाही.
भाजपाचे प्रताप पाटील, दिनकर चव्हाण, राजेंद्र घोडपडे, रणजित पाटील, विद्याताई पाटील यांची भाषणे झाली. जिल्हा परिषदेचे सदस्य निजाम मुलाणी यांनी आभार मानले. प्रा. दत्तात्रय पाटील ,सुजित थोरात यांनी सूत्रसंचालन केले.