वाढत्या पाठिंब्यामुळे प्रचारात रंगत; चिंचवडचा रणसंग्राम तापला
पिंपरी – चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार तथा शिवसेनेचे महापालिकेतील गटनेते यांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार रंगत आणली आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांच्या प्रचाराला मिळणारा पाठींबा, विविध सोसायट्या, समाज आणि संघटनांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे चिंचवडमध्ये सुरूवातील एकतर्फी वाटणारी लढत अटीतटीची होणार हे स्पष्ट झाले आहे. वंचित आघाडी, समाजवादी पक्षाचा पाठिंबा तसेच वाकड, थेरगाव, पिंपळे-गुरवसह विविध गावागावांमध्ये झालेल्या बैठकांमध्ये ग्रामस्थांनी कलाटे यांना जाहीर पाठींबा दिला आहे.
भाजप-शिवसेना महायुतीने विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप यांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून वेळीच लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी जाहीर झाली. परंतु, या मतदार संघातील प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या राष्ट्रवादी-कॉंग्रेस आघाडीचे प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याने कलाटे यांना पाठींबा दिला आहे. राहुल कलाटे यांनी मागितलेले बॅट हे चिन्हही त्यांना मिळाल्याने कार्यकर्त्यांमधील उत्साहही वाढला आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत कलाटे यांनी भाजपाच्या उमेदवाराला जोरदार लढत देत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळविली होती. यावेळी कलाटे यांनी पुन्हा अपक्ष अर्ज कायम ठेवल्याने जगताप-कलाटे या लढतीची पुनरावृत्ती पुन्हा एकदा झाली आहे.
उमेदवारच नसल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसनेही राहुल कलाटे यांना पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केले. वंचित बहुजन आघाडी, समाजवाडी पक्षानेही त्यांना पाठिंबा दिला आहे. भाजप-शिवसेनेतील नाराजांची छुपी रसद कलाटे यांना मिळत आहे. वाकड, थेरगावातील ग्रामस्थांनी तसेच विविध सोसायट्यांनी बैठका घेत कलाटे यांना पाठिंबा दिल्यामुळे अपक्ष असूनही कलाटे यांची उमेदवारी चर्चेत आली आहे.
कलाटे हे शिवसेनेचे माजी शहरप्रमुख आहेत. तसेच विद्यमान शिवसेनेचे गटनेते व स्थायी समिती सदस्य आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर जगताप यांना कडवी लढत दिली होती. परंतु, मोदी लाटेचा फायदा जगताप यांना झाला. त्यातच राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नाना काटे हे रिंगणात होते. मात्र, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कलाटे यांना पाठिंबा दिल्याने राष्ट्रवादीला मिळणारी मते त्यांच्यासाठी बेरजेची ठरणार आहेत. याखेरीज वंचित आघाडीच्या पाठिंब्याचाही त्यांना फायदा होणार आहे. वाकडसह थेरगाव, पिंपळे निलख या भागात कलाटे यांचे प्राबल्य आहे. याखेरीज चिंचवड, पिंपळे गुरव, रावेत, सांगवी या भागातील जगताप विरोधकांची त्यांना मिळत असलेली साथ त्यांच्यासाठी जमेची बाब
ठरली आहे.
चिंचवड विधानसभा मतदार संघात आपण शिवसेनेकडून इच्छूक होतो. परंतु, महायुतीच्या जागा वाटपात ही जागा भाजपला गेली. मतदार संघातील कुठल्यातरी एका भागाचा विकास म्हणजे मतदार संघाचा विकास होत नाही. समतोल आणि शाश्वत विकासासाठी आपण शिवसेनेकडून मिळालेल्या महत्त्वाच्या पदांची पर्वा न करता जनतेचा उमेदवार म्हणून आपण निवडणुकीत उतरलो आहे. प्रस्थापित आणि हुकूमशाही विरोधातील ही लढाई आहे. त्यामुळे जनसामान्यांचा आपल्याला वाढता पाठिंबा आहे, अशी प्रतिक्रिया राहुल कलाटे (अपक्ष उमेदवार) यांनी दिली.