पिंपरी – भोसरी येथे पादचारी मार्गावर दुकान मांडून बसणाऱ्या तरुणास लुटण्यासाठी हवेत गोळीबार केल्या प्रकरणी आणखी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक पिस्टलही जप्त केले आहे. याप्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे.
सनी उर्फ सॅंडी कन्हैयालाल गुप्ता (वय 24, रा. बोऱ्हाडे वस्ती, मोशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर यापूर्वी शिवाजी खरात, विकास जैसवाल, गुरुदत्त उर्फ बाबा अशोक पांडे (रा. नारायण रसाळ चाळ, मंडई जवळ, भोसरी) यांना पोलिसांनी अटक केली आहे. अक्षय अंगत भांडवलकर (वय 21, रा. धावडे वस्ती, भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी येथे अंकुशराव लांडगे नाट्यगृहाच्या समोर अक्षय मोबाईलचे स्पेअर पार्ट विक्रीचे दुकान मांडतो. 11 ऑगस्ट रोजी पाच आरोपी दुपारी त्याच्या दुकानासमोर कारमधून आले.
“तुझ्याकडे जे असेल ते काढून दे, आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणून दमबाजी केली. अक्षय यांनी पैसे देण्यास विरोध केला. त्यावरून चिढलेल्या आरोपी सनी याने पिस्तुलातून हवेत गोळीबार केला. त्यानंतर अक्षय यांच्या गळ्यातील 60 हजार रुपये किंमतीची दोन तोळ्यांची सोन्याची साखळी आणि दुकानाच्या पेटीतून 2 हजार 450 रुपये जबरदस्तीने हिसकावून नेले. आरोपी सनी कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी समीर रासकर व सुमित देवकर यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सनी याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेले 35 हजार रुपयांचे एक गावठी बनावटीचे पिस्टल जप्त केले आहे. आरोपी बाबा पांडे याच्याकडून अक्षय यांची चोरून नेलेली 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची साखळी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपी सनी आणि बाबा पांडे या दोघांवर गंभीर आठ गुन्हे दाखल आहेत.