पिंपरी – वाल्हेकरवाडी, थेरगाव, रहाटणी परिसरात पुन्हा एकदा अनधिकृत बांधकामे जोमात सुरू झाली आहेत. विधानसभा निवडणूक आचारसंहिता व निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने कारवाई होणार नाही, असे वाटत असल्याने अनधिकृत बांधकामे बिनदिक्कतपणे चालू आहेत.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सध्या सुरू आहे. 24 ऑक्टोंबरला मतमोजणी होणार आहे. म्हणजे जवळपास एक महिन्यांचा कालावधी निवडणूक प्रक्रियेत जाणार आहे. या काळात बहुतांश अधिकारी व कर्मचारी निवडणूक कामात व्यस्त राहणार आहेत. या संधीचा फायदा घेऊन अनधिकृत बांधकामांना वेग आला आहे. एक ते दोन गुंठा जागेसाठी असलेल्या चटई क्षेत्र निर्देशांकाच्या (एफएसआय) दुप्पट-तिप्पट बांधकामे होत आहेत. बांधकामे करताना पार्किंगसाठी आवश्यक व्यवस्था केली जात नसल्याचे चित्र आहे. तसेच, पुरेसे सामासिक अंतर देखील सोडण्यात येत नसल्याचे पाहण्यास मिळत आहे.
प्राधिकरण मालकीच्या आणि ज्यावर स्वत: प्राधिकरण विकास करणार आहे, अशा क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून नवनगर विकास प्राधिकरणाकडे जबाबदारी असणार असल्याचे राज्य सरकारने नुकत्याच एका अधिसुचनेद्वारे स्पष्ट केले आहे. तसेच, प्राधिकरणाने भाडेपट्ट्याने वितरित केलेल्या क्षेत्रासाठी नियोजन प्राधिकरण म्हणून महापालिकेकडे जबाबदारी राहणार आहे. पर्यायाने, संबंधित क्षेत्रातील अतिक्रमणे हटविण्याची देखील जबाबदारी महापालिकेकडे असणार आहे. त्यामुळे प्राधिकरणाकडून सद्य:स्थितीत प्राधिकरण मालकीच्या जागांवर झालेली अतिक्रमणे, होत असलेली अनधिकृत बांधकामे यांच्याकडेच लक्ष देण्यात येत आहे. अशा अनधिकृत बांधकामांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. पोलीस बंदोबस्त आणि कर्मचारी वर्ग उपलब्ध झाल्यानंतर संबंधित अनधिकृत बांधकामांबाबत कारवाई केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
प्राधिकरणाची मोकळी जागा व त्यावरील अतिक्रमणे काढावी लागणार आहे. सध्या निवडणुकीच्या कामात अधिकारी, कर्मचारी गुंतले असल्याचा गैरफायदा घेऊ नये. अनधिकृत बांधकामांचे व्हिडिओ चित्रीकरण केले जात आहे. संबंधित बांधकामे पाडण्याची कारवाई केली जाईल.
– प्रमोद यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राधिकरण