पुणे – विधानसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारी दुपारपासून लागू झाली. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्यासह पदाधिकारी, विशेष समिती अध्यक्ष तसेच प्रभाग समिती अध्यक्षांनी आपली वाहने महापालिकेकडे जमा केली.
दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास महापौर टिळक यांनी आपले वाहन मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहन विभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर महापौर रिक्षातून निवासस्थानी गेल्या. स्थायी समिती सदस्य दीपक पोटे यावेळी उपस्थित होते.
स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी आपली वाहने महापौर बंगल्यावरच प्रशासनाच्या ताब्यात दिली. या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची बैठक सुरू होती. आचारसंहितेमुळे राजकीय पदाधिकाऱ्यांना पालिकेच्या सुविधांचा लाभ घेता येत नाही. या कालावधीत शासकीय वाहनांचा वापरही पदाधिकाऱ्यांना करता येत नाही. त्यामुळे आचारसंहीतेची घोषणा होताच, वाहन विभागाच्या चालकांनी या 28 वाहने ताब्यात घेत त्या भवन विभागाच्या कार्यालयात ठेवल्या आहेत.