नद्यांच्या पाणीपातळीत अंशतः घट
सातारा – सातारा जिल्ह्यात माण व खटाव तालुके वगळता सर्वच तालुक्यांत पावसाने 8 ऑगस्ट अखेर 1095 मिलिमीटरची नोंद करत सरासरी ओलांडली आहे. सरासरीच्या 261 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाच्या सूत्रांनी सांगितले. कोयना धरणात गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 102 टीएमसी पाणीसाठा नोंदला गेला.
जिल्हयात यंदाच्या पावसाने सगळेच विक्रम मोडीत काढले आहेत. पंधरवड्यापूर्वी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सरासरीच्या पस्तीस टक्के कमी कामगिरी करणाऱ्या पावसाने पुढील टप्प्यात सगळाच अनुशेष भरून काढल्याचे चित्र आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कोयना धरणात 55.39 टीएमसी पाणीसाठा होता. 26 जुलैनंतर गुरुवारी सकाळी आठपासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना पाणलोट क्षेत्रातील नवजा येथे 184, महाबळेश्वर 168 व कोयनेत 151 मिलिमीटर पावसाची नोंद व्हायला सुरवात झाल्यानंतर पावसाची असाधारण कामगिरी लक्षात यायला सुरवात झाली होती.
सातारा जिल्ह्याचा सरासरी पाऊस 830 ते 918 मिलीमीटर असल्याच्या नोंदी आहेत. तब्बल दीड महिना उशिरा आलेल्या मॉन्सूनने केवळ पंधरा दिवसात 1095.13 मिलिमीटर पावसाची नोंद करत सरासरी पातळी सहज ओलांडली. यंदा पावसाचा सरासरी वार्षिक अंदाज 152.40 मिलिमीटर नोंदला गेला आहे. पावसाचे आगार असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये सरासरीच्या दुप्पट साडेचार हजार मिलीमीटर पाऊस झाला आहे. गुरूवारी महाबळेश्वरात 235 मिमी पावसाची तर आज अखेर 5525 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातील पाण्याची पोतळी 644.13 मीटर (2113 फूट) झाली आहे.
धोम धरण परिसरात 16 (एकूण 327) कण्हेरमध्ये 3 (371), उरमोडीत 34 (550 मिलिमीटर) पाऊस आज दिवसभरात झाला. गेल्या 24 तासांत तो अनुक्रमे धोममध्ये 22, कण्हेरमध्ये 32 व उरमोडीत 62 मिलिमीटर झाला. धोममध्ये 30 टक्के तर कण्हेरमध्ये 27 टक्के पाणीसाठा झाला आहे. जिल्ह्याची जुलैअखेरच्या पावसाची सरासरी 501.2 असून, आजअखेर 609.4 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला आहे. गतवर्षी आजच्या तारखेस 301 मिलिमीटर सरासरी पाऊस झाला होता.
पावसाचे अनेक विक्रम; सरासरीच्या 261 मिलिमीटर अधिक पावसाची नोंद
सातारा 56 (328.5) 183.4, जावळी 75.3 (580.2), कोरेगाव 38.8 (169.4) 107.6, कराड 48.6 (201.7) 153.6, पाटण 60 (456) 382.2, फलटण 24 (233) 17, माण 13 (170.2) 42, खटाव 12.4 (184.5) 14.7, वाई 26 (282.7) 157.7, महाबळेश्वर 235 (5525) 1707.7, खंडाळा 12 (209.3) 76 एकूण 456 (3309.2 मिमी)
आजपर्यंतचा पाऊस -(जूनपासूनचा पाऊस)
कराड- कोयना धरण क्षेत्रात जोमदार पाऊस कोसळत असून, धरणाच्या खालील क्षेत्रात कराड व पाटण तालुक्यांच्या पूर्व भागात पावसाचा जोर आज दिवसभरात कायम होता. त्यामुळे कृष्णा- कोयना नद्यांच्या पाणीपातळीत अंशतः घट झाली असून कराडमध्ये पूरस्थिती तूर्त टळली असली तरी सांगली व कोल्हापूर जिल्हयात अजूनही पुराचा धोका कायम असल्याने प्रशासन हाय अलर्टवर आहे.