नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी चक्क लोकसभेत घोषणाबाजी केली. विषय होता कर्नाटकमधील राजकीय घडामोडींचा. राहुल दुपारच्या सुमारास लोकसभेत दाखल झाले. त्यावेळी कॉंग्रेस नेते अधिररंजन चौधरी हे कर्नाटकच्या मुद्द्यावर बोलत होते. भाजपकडून कॉंग्रेसच्या आमदारांची शिकार केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, सभापती ओम बिर्ला यांनी त्यांना रोखले. त्या मुद्द्यावर सोमवारीच सभागृहात चर्चा झाल्याचे बिर्ला यांनी म्हटले. मात्र, सभापतींच्या प्रतिसादामुळे समाधान न झालेल्या चौधरी यांनी तो मुद्दा पुन्हा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला.
चौधरी यांनी एका कागदावर काही घोषणा लिहून तो कागद कॉंग्रेस सदस्यांकडे दिला. त्यानंतर कॉंग्रेस सदस्यांनी तातडीने त्या घोषणा देण्यास सुरूवात केली. तानाशाही बंद करो, शिकार की राजनीती बंद करो या त्या घोषणा होत्या. त्या घोषणाबाजीत राहुलही सहभागी झाले. अर्थात, त्यांचा आवाज इतर सदस्यांइतका मोठा नव्हता. त्याशिवाय, ते घोषणांमधील अखेरचे शब्दच उच्चारत होते. मात्र, राहुल यांच्या घोषणाबाजीची कृती 17 व्या लोकसभेत प्रथमच दिसली.