कॉंग्रेस नेते शिवकुमारांना हॉटेलबाहेरच थांबवण्याची आमदारांची मागणी
मुंबई : कर्नाटकात सुरू असणारा सत्तासंघर्षात रोज नवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. दरम्यान, राजीनामे दिलेले कर्नाटकातील कॉंग्रेस-जेडीएसचे आमदार यांच्या मनधरणीसाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. राजीनामे दिलेले बंडखोर आमदार सध्या मुंबईच्या रेनसॉंस हॉटेलमध्ये असून त्यांच्या मनधरणीसाठी कॉंगेसचे नेते शिवकुमार यांना पाचारण करण्यात आले आहे. त्यासाठी त्यांनी रेनसॉंस हॉटेलकडे धाव घेतली आहे. मात्र, त्यांना हॉटेलच्या बाहेरच थांबवण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेनसॉंस हॉटेलबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, “कर्नाटक सरकार आम्हाला पळवून नेण्याच्या प्रयत्नात असून आम्हाला सुरक्षा द्या, तसेच डी.शिवकुमार यांना हॉटेलच्या बाहेरच थांबवा” अशी मागणी बंडखोर आमदारांनी केली आहे. तर तिकडे शिवकुमार यांनी या हॉटेलमध्ये आपला भाऊ थांबला असून हॉटेलमध्ये जाण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नसल्याचे म्हटले आहे.
दरम्यान, यासर्व गोंधळात बंडखोर आमदारांच्या समर्थकांनी ‘कुमारस्वामी गो बॅक’ अशा घोषणा दिल्या. त्यामुळे कर्नाटकातील सत्तासंघर्ष हा नेमका कोणत्या वळणावर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.