रस्त्यात अडवणूक होणार नाही, पण दंड भरावाच लागणार
पुणे – नागरिकांना भररस्त्यात अडवून हेल्मेटबाबत कारवाई न करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलिसांना दिल्या आहे. मात्र, हेल्मेटबाबतची कारवाई सुरूच राहणार असून, ती रस्त्यावर न होता सीसीटीव्ही आणि ई-चलनद्वारे केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी म्हटले आहे.
हेल्मेट कारवाईबाबत आमदार माधुरी मिसाळ यांच्यासह अन्य आमदारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना कारवाई शिथिल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यातून शहरातील कारवाई शिथिल करण्यात आली आहे. हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर नाकाबंदी, सीसीटीव्ही अशा एक ना अनेक माध्यमांतून कारवाई करण्यात येत होती.
हेल्मेटचा नियम न पाळणाऱ्यांच्या खिशाला थेट 500 रुपयांची कात्री लागत होती. मागील काही दिवसांमध्ये अनेक वाहनचालकांकडून हेल्मेट न वापरल्याप्रकरणी हजारो रुपयांचा दंड देखील वसूल करण्यात आला होता. जानेवारीपासून हेल्मेट सक्तीच्या कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येत होती. गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये ठिकठिकाणी पोलिसांनी कारवाईचा सपाटा लावला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार ही कारवाई शिथिल करण्यात आली आहे. यामुळे पुणेकरांनी दिलासा व्यक्त केला आहे. तरी पुणेकरांनी हेल्मेट कारवाईपासून सुटका मिळाल्याचा भ्रमात न राहता हेल्मेट वापराच्या नियमाचे पालन गरजेचे आहे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
हेल्मेट न वापरणाऱ्या वाहनचालकांवर सीसीटीव्ही आणि ई-चलनाद्वारे कारवाई सुरू राहणार आहे. नियमभंग केल्याबाबत वाहनचालकांच्या नावावर घरी ई-चलन पाठविण्यात येणार आहे.
– पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग.