शिस्त लावण्यात अपयश ः आयुक्तांच्या परिपत्रकांना वाटाण्याच्या अक्षता
पिंपरी – लेटलतीफ कर्मचाऱ्यांबरोबरच विनाकारण रेंगाळणारे कर्मचारी महापालिका प्रशासनाला जुमानत नसल्याचे आतापर्यंत अनेकदा सिद्ध झाले आहे. नागरिकांच्या सेवेसाठी भरती करण्यात आलेले कर्मचारी आता नागरिकांना तर सोडाच पण प्रशासनालाही जुमानत नाहीत. या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याच्या प्रयत्नात आयुक्त श्रावण हर्डीकर मात्र अपयशी ठरले आहेत.
आतापर्यंत काढलेल्या परिपत्रकाला कर्मचाऱ्यांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी आतापर्यंत काढलेले हे परिपत्रक निव्वळ फार्स ठरणार असल्याचे चित्र आहे. महापालिका कर्मचाऱ्यांची कार्यालयीन शिस्त हा संशोधनाचा स्वतंत्र विषय ठरू शकतो, एवढा हा प्रश्न गहन बनला आहे. कार्यालयीन शिस्त पाळा, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करू, अशा आशयाची आतापर्यंत अनेक परिपत्रके प्रशासनाने काढली आहेत.
दोन दिवसांपूर्वीदेखील याच आशयाचे परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांना शिस्त पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या तीन वेळेचा विलंब आता एक रजा म्हणून गणला जाणार आहे. तर विनाकारण कर्मचाऱ्यांनी कामाशिवाय अन्यत्र फिरू नये, असे या परिपत्रकातही तंबी देण्यात आली आहे. एकाद्या कर्मचाऱ्याला फिरती ड्युटी असल्यास, तशी रजिस्टरमध्ये नोंद करुन देण्याची सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय विनाकारण महापालिका मुख्यालय अथवा कार्यालयाच्या आवारात रेंगाळू नये, असे देखील बजावले आहे.
दरम्यान, प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवरील वचक कमी झाल्यानेच हे कर्मचारी अशा परिपत्रकांना दाद देत नसल्याचे अनेकदा स्पष्ट झाले आहे. यापूर्वी देखील लेटलतीफ व कामाशिवाय कॅन्टीनमध्ये रेंगाळणाऱ्या कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून, त्यांच्याकडून लेखी खुलासा घेण्याचा प्रयत्न तत्कालीन सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडून झाला होता. खुलासा घेण्याचे काम संबंधित कर्मचाऱ्याच्या विभागप्रमुखांवर सोपविण्यात आले होते. मात्र, या कर्मचाऱ्यांवर कोणती कारवाई झाली, याची माहितीही प्रशासनाकडेच उपलब्ध नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे या कर्मचाऱ्यांवरील कारवाई दडपण्यात आली होती.