महापालिका शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी शाळा दत्तक योजना

दत्तक शाळा योजना राबविली जाणार
पिंपरी – महापालिकेच्या 15 उपक्रमशील शाळांच्या माध्यमातून नवीन शाळा दत्तक घेऊन शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मुलांची पटसंख्या, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, डी.बी.टी. योजना अशा विविध पातळ्यांवर काम केले जाणार आहे.

महापालिकेच्या यापूर्वी 12 उपक्रमशील शाळा होत्या. त्यामध्ये आता नव्याने 3 शाळांची भर पडली आहे. महापालिका शाळांची गुणवत्ता वाढावी, यासाठी उपक्रमशील शाळांनीच महापालिकेच्या अन्य शाळांना दत्तक घेऊन गुणवत्ता वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणे अभिप्रेत आहे. उपक्रमशील शाळांमध्ये सध्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी “दफ्तरविना शाळा’ हा उपक्रम राबविला जात आहे. यू ट्युबच्या माध्यमातून विविध प्रयोगांची माहिती घेऊन विद्यार्थी त्याचा प्रत्यक्ष प्रयोगामध्ये वापर करीत आहे. विविध व्याख्यात्यांना बोलावून विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी मार्गदर्शन केले जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंगसारख्या उपक्रमातून विद्यार्थ्यांना पाणी बचतीचा संदेश दिला जातो.

महापालिका शाळांतील उपक्रमशील शाळांसमवेत 24 जानेवारीला प्राथमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात पहिली बैठक घेण्यात आली. या बैठकीत महापालिकेच्या अन्य शाळांमध्ये देखील विविध उपक्रम राबविणे आवश्‍यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. दुसरी बैठक 31 जानेवारीला अजंठानगर येथील शाळेत झाली. संबंधित बैठकीत भाषा, विज्ञान, गणित, समाजशास्त्र, इंग्रजी आदी विषय समित्यांची स्थापन करण्यात आली.

15 फेब्रुवारीला झालेल्या तिसऱ्या बैठकीत अभ्यासात अप्रगत असलेल्या विद्यार्थ्यांना लेखन, वाचन क्षमतेपर्यंत आणण्यासाठी काय करता येईल, याविषयी भाषा समितीप्रमुख रेखा पुरोहित यांनी मार्गदर्शन केले. 13 मे रोजी शिक्षण विभागात झालेल्या बैठकीत शाळांची पटसंख्या, सर्वेक्षण, आरोग्य तपासणी, डी.बी.टी. योजना, दिव्यांग मुलांचे अनुदान, अध्ययनात अकार्यक्षम असलेल्या मुलांसाठी काय करता येईल, याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.

उपक्रमशील शाळांकडूनच राबविला जाणार उपक्रम

प्राथमिक शिक्षण विभाग पर्यवेक्षिका अनिता जोशी व सुजाता खणसे यांनी सांगितले की, महापालिकेच्या उपक्रमशील शाळांच्या माध्यमातून अन्य शाळांमध्ये देखील विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी शाळा दत्तक योजना राबविली जाणार आहे. त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, गुणवत्ता वाढ, शोधक वृत्ती वाढविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.