-मार्चमधील औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी 0.1 टक्क्यांनी कमी
-सरलेल्या वर्षातील औद्योगिक उत्पादन केवळ 3.6 टक्के
नवी दिल्ली – खासगी गुंतवणूक वाढत नाही. देशभरातून मागणी कमी झाली आहे. या कारणामुळे मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन वाढण्याऐवजी ते 0.1 टक्क्याने कमी झाल्यामुळे सरकार बॅंकिंग आणि औद्योगिक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हा 21 महिन्यातील नीचांक आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात औद्योगिक उत्पादन तब्बल 5.3 टक्क्यांनी वाढले होते. गेल्या अनेक महिन्यापासून सेवा क्षेत्र आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता कमी झालेली आहे. आता औद्योगिक उत्पादनच कमी झाल्यामुळे याचा राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकडेवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
सरलेल्या पूर्ण वर्षात औद्योगिक उत्पादनात केवळ 3.6 टक्के वाढ झालेली आहे. गेल्यावर्षी औद्योगिक उत्पादनात 4.4 टक्क्यांनी वाढ झाली होती. या आकडेवारीची सरकार आणि बॅंकांकडून गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.
नव्या सरकारला यातून मार्ग काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्या लागत असल्याचे बोलले जात आहे. गेल्याच आठवड्यात मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा क्षेत्राची उत्पादकता कमी झाल्याची आकडेवारी जाहीर झाली होती. मार्चमध्ये मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्राची उत्पादकता 0.4 टक्क्यांनी कमी झाली आहे.