Lok Sabha Election 2024 – देशभरात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या आहेत. तिसऱ्या टप्प्यात राज्यातील 11 लोकसभा मतदारसंघांत 7 मे रोजी मतदान होणार आहे.
या मतदारसंघांतील प्रचाराच्या तोफा रविवारी सायंकाळी 5 वाजता थंडावल्या आहेत. यात अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेषत म्हणजे राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे बारामती राखणार का हे या टप्प्यातील निकालांवरून ठरणार आहे.
देशात तिसऱ्या टप्प्यात १२ राज्यांमध्ये ९४ मतदारसंघात मतदान पार पडणार आहे. यात राज्यातील रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांचा समावेश आहे.
या टप्प्यात बारामतीत महाविकास आघाडीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजयीची लढत होत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांच्या सख्ख्या भावासह संपूर्ण पवार कुटुंबीय शरद पवार यांच्या मागे एकवटले आहेत.
दुसरीकडे अजित पवार यांनीही जोरदार मोर्चेबांधणी केली असून महायुती त्यांच्या पाठिशी आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या या अस्तित्वाच्या लढाईची माध्यमांनीही दखल घेतली आहे.
याशिवाय माढा हा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला तो अकलूजच्या मातब्बर मोहिते पाटील घराण्यामुळे. माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांना उमेदवारी हवी होती. मात्र भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली.
त्यामुळे मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून भाजपला अनपेक्षित धक्का दिला. त्यांच्यापाठोपाठ अजित पवार गटाचे उत्तम जानकर यांनीही ही शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून अजित पवार यांच्यासह भाजपला आणखी एक धक्का दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे धैर्यशील मोहिते पाटील आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात लढत होत आहे.