पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – कंपनीतील अधिकाऱ्यास मनी लॉड्रिंगची भीती दाखवून आरटीजीएसद्वारे ४९ लाख ३७ हजार रुपये वर्ग करण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे सायबर चोरट्यांनी त्याला तब्बल तीन दिवस स्काइप आयडीवरील व्हिडिओ कॉल सुरू ठेवण्यास लावून त्याच्या हालचलींवरही नियंत्रण ठेवले. याप्रकरणी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हरि सिंग (४१,रा. भोसलेनगर, शिवाजीनगर) यांना एका कुरिअर कंपनीचे नाव सांगत त्यांचे कुरिअर कस्टम विभागाने पकडल्याचे सांगितले. त्यामध्ये १४० ग्रॅम एमडी आणि पाच पासपोर्ट असल्याचे सांगितले. त्यांनी कुरिअर आपले नसल्याचे सांगितल्यावर त्यांना स्काइपवर व्हिडिओ कॉल सुरू करण्यास सांगितले गेले.
समोरुन मुंबई क्राइम ब्रँचला फोन वर्ग करत असल्याचे भासवले. त्यावर पोलिसांच्या ड्रेसमधील व्यक्तीने उप निरीक्षक बोलत असल्याचे सांगत हरि सिंग यांचा आधारकार्ड नंबर सांगून तो मनी लॉड्रिंगसाठी वापरला गेल्याचे सांगितले. शिवाय, स्काइप व्हिडिओ बंद ठेऊन ऑडिओ सुरू ठेवायचा दम भरला. नंतर सीबीआयची भीती दाखवून बँकेतील सर्व एफडी मोडायला भाग पाडल्या.
हे सर्व पैसे आरटीजीएसद्वारे ४० लाख ९९ हजार करुन घेतले. यानंतर पुन्हा घरातल्या कामवाल्या बायकांचे फोटो दाखवायला लावून त्यांचाही सहभाग असल्याचे सांगत ८ लाख ३८ हजार वर्ग करण्यास भाग पाडले. यानंतर आराम करण्यास जाण्यास सांगितले. थोड्या वेळाने सिंग यांनी बाथरुमला जायची परवानगी मागितली असता, फोन बंद झाल्याचे आढळले. त्यांनी आलेल्या सर्व नंबरवर संपर्क साधला, मात्र सर्व नंबर बंद होते. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.