IPL 2024, Punjab Kings : पंजाब किंग्जला दुहेरी धक्का बसला आहे. संघाने शेवटचा सामना राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. आता पंजाबचा कर्णधार शिखर धवनबाबत वाईट बातमी समोर आली आहे. राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात धवन दुखापतीमुळे संघाबाहेर होता. आता जे नवीन अपडेट समोर आले आहे त्यानुसार धवन फक्त एका सामन्यातून नाही तर पुढच्या काही सामन्यांतून बाहेर पडणार असल्याचे समजते.
वास्तविक, आयपीएल 2024 मध्ये शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध तीन गडी राखून पराभव स्वीकारल्यानंतर पंजाब किंग्जला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संघाचा कर्णधार शिखर धवन खांद्याच्या दुखापतीमुळे किमान सात ते दहा दिवस बाहेर आहे. सात दिवस जरी तो बाहेर राहिला तर संघाच्या पुढील दोन सामन्यांमध्ये तो खेळू शकणार नाही.
पुढील 10 दिवसांत पंजाब आपले पुढील दोन्ही सामने घरच्या मैदानावर खेळणार आहे. पंजाबला 18 एप्रिलला मुंबई इंडियन्स आणि 21 एप्रिलला गुजरात टायटन्सविरुद्ध खेळायचे आहे. त्यानंतर संघाचा पुढील सामना 26 एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर यांनी याला दुजोरा दिला आहे.
शनिवारी रात्री राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यातही धवन खेळू शकला नाही. सॅम करनने त्याच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व केले. धवनच्या दुखापतीबाबत पंजाब किंग्जचे क्रिकेट डेव्हलपमेंटचे प्रमुख संजय बांगर म्हणाले की, “त्याच्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो किमान काही दिवस बाहेर असण्याची शक्यता आहे. आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल आणि तो उपचारांना कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागेल, परंतु आत्ता असे दिसते आहे की, तो पुढील 7 ते 10 दिवसांसाठी संघाबाहेर असू शकतो. संथ विकेट्सवर खेळण्याचा भरपूर अनुभव असलेल्या धवनसारख्या अनुभवी सलामीवीराच्या अनुपस्थितीचा परिणाम संघावर होतो.”
पंजाबची अवस्था आहे वाईट ….
सध्याच्या मोसमात पंजाबची स्थिती खूपच वाईट आहे हे विशेष. या मोसमात संघाने 6 सामने खेळले आहेत, ज्यात त्यांना फक्त 2 जिंकता आले आहेत. संघाने आयपीएल 2024 ची सुरुवात विजयाने केली. पहिल्या सामन्यात पंजाबने दिल्ली कॅपिटल्सचा 4 गडी राखून पराभव केला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्याविरुद्धचे पुढील दोन सामने संघ हरला. त्यानंतर पुढच्या सामन्यात संघाने गुजरात टायटन्सचा 3 गडी राखून पराभव केला. यानंतर हैदराबाद आणि राजस्थानविरुद्धच्या पुढील दोन सामन्यांत संघाला पराभवाचा सामना करावा लागला.