पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बारामतीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची ललकारी देणाऱ्या विजय शिवतारेंनी आपली तलवार म्यान करत सुनेत्रा पवारांच्या प्रचारात हजेरी लावली असली, तरी गुरुवारी पुण्यात शिवतारेंबाबत प्रश्न विचारताच उपमुख्यमंत्री अजित पवार चांगलेच भडकल्याचे पाहायला मिळाले.
शिवतारेंची नाराजी दूर करण्यासाठीच्या बैठकीत त्यांनी आपल्या कोणाकोणाचे फोन आले हे दाखविले होते. त्या वेळी शिवतारेंना कोणा कोणाचे फोन गेले होते? असा प्रश्न विचारताच तुम्ही मला मी मूर्ख समजू नका?आंबेडकरांनी जे संविधान दिलेलंय,
त्या संविधानाप्रमाणे मला जेवढं बोलायचं तेवढं मी बोललेलो आहे आणि तेवढंच मी बोलेन. मला सांगायचं ते सांगितलं आहे, असे सांगत या प्रश्नाला बगल देत पत्रकारांवरच आगपाखड केली.
महात्मा फुले जयंती आणि रमजान ईदनिमित्त महात्मा फुले स्मारक येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी छगन भुजबळ कमळावर लढण्यास तयार नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देणे टाळले.
शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांचे फोन आल्याचे सांगितले होते. त्यानंतर शिवतारे यांना सुप्रिया सुळेंनी फोन केल्याची चर्चा आहे.
आज सातारा, नाशिकबाबत चर्चा करू
सातारा आणि नाशिकबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे पवार या वेळी बोलताना म्हणाले. महाराष्ट्रात पाच टप्प्यांत निवडणुका आहेत. यात या दोन्ही ठिकाणी अद्याप फॉर्म भरायला सुरुवात झालेली नाही. नाशिक किंवा कोकण यांच्यातले फॉर्म भरायला शेवटच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे त्याला वेळ असला, तरी मी आज मुख्यमंत्र्यांसोबत मुंबईला जाणार असून, उद्या देवेंद्र फडणवीस मुंबईत आहेत. या बैठकीत आम्ही तोडगा काढू, असे अजित पवार म्हणाले.