Maharashtra Lok Sabha – महायुतीमधील जागावाटपात शिवसेनेचे मुख्य नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काही जागा गमावल्या आहेत, तर काही मतदारसंघात त्यांना उमेदवार बदलावे लागले आहेत. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या चार जागा राखल्यात आणखी एक-दोन जागा पदरात पाडून घेत महायुतीतील जागावाटपात आपली दादागिरी दाखवून दिली आहे.
अजित पवार महायुतीत उशिरा आले पण आपल्या समर्थकांना न्याय देण्यात एकनाथ शिंदेंपेक्षा यशस्वी ठरलेले सध्यातरी दिसत असल्याची चर्चा राज्यभरात आहे. कोणत्याही आघाडी आणि युतीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा शेवटपर्यंत सुरु असतो. त्याची प्रचिती सध्या राज्यात महायुतीमध्ये दिसत आहे. मात्र या जागा वाटपाच्या वाटाघाटीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस शिंदेच्या शिवसेनेपेक्षा काकणभर सरस ठरलेली आहे.
अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले तेव्हा रायगडचे सुनील तटकरे हे एकमेव खासदार त्यांच्यासोबत होते. एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यातील बारामती येथील सुप्रिया सुळे, शिरुरचे डॉ. अमोल कोल्हे आणि सातारा येथील खासदार श्रीनिवास पाटील शरद पवारांसोबत राहिले. । Eknath Shinde | Ajit Pawar | Lok Sabha Election 2024
महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांनी रायगडमध्ये सुनील तटकरे यांना पुन्हा उमेदवारी घोषित केली. बारामती मतदारसंघात त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळवून देण्यात ते यशस्वी ठरले. शिरुरचे खासदार अमोल कोल्हे नेमके कोणासोबत असा घोळ बरेच दिवस सुरु होता. मात्र जागावाटपाच्या आधी तो मिटला आणि डॉ. कोल्हे शरद पवार गटात असल्याचे स्पष्ट झाले.
विद्यमान खासदार सोडून गेला असला तरी शिरुरची जागा अजित पवारांनी आपल्या पारड्यात पाडून घेतली. येथून डॉ. अमोल कोल्हेंच्या विरोधात पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आढळराव पाटील यांना पक्षात प्रवेश देऊन या जागेवरही राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह निवडणुकीत कायम ठेवले. शिरुरमधून अढळराव पाटील यांनी शिंदे सेनेची साथ सोडत हातावर घड्याळ बांधले. येथेही अजित पवारच शिंदेंपेक्षा उजवे ठरले.
धाराशिव (उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ) ची अतिरिक्त जागा अजित पवारांनी मिळवली आहे. महायुतीत ही जागा शिंदेंच्या शिवसेनेला जाण्याची शक्यता होती. मात्र तुळजापूरचे माजी आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन धाराशिवच्या उमेदवार घोषित केले गेले. सातारची जागा राष्ट्रवादीची आहे.
मात्र यंदा तिथे भाजपचे उदयनराजे भोसले यांना लढायचे असल्यामुळे या जागेच्या बदल्यात नाशिकची जागा मिळवण्यात राष्ट्रवादीची दादागिरी चाललेली दिसते. अजून येथून उमेदवाराची घोषणा झाली नसली तरी अजित पवार गटाचे छगन भुजबळ हेच येथून उमेदवार असण्याची शक्यता आहे. । Eknath Shinde | Ajit Pawar | Lok Sabha Election 2024