रायपूर – छत्तीसगडमध्ये लोकसभा निवडणुकीपूर्वी नक्षलवाद्यांना मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईत सुरक्षा दलांनी 8 तासांच्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. या परिसरात कुख्यात नक्षलवादी पापा राव असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.
त्यानंतर डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफची संयुक्त पथकाने विजापूरमधील गांगलूर पोलीस ठाण्यात शोधासाठी मोहिम राबविली. या मोहिमेवेळी झालेल्याचकमकीनंतर घटनास्थळी 3 महिला माओवाद्यांसह एकूण 13 माओवाद्यांचे मृतदेह आढळले आहेत.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विजापूर जिल्ह्यातील गांगलूर पोलीस स्टेशन हद्दीतील लेंद्रा गावातील जंगलात मंगळवारी सकाळी नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यावेळी सुरक्षा दलांनी एका महिला नक्षलवाद्यांसह 10 नक्षलवाद्यांचे मृतदेह ताब्यात घेतले.
परिसरात शोधमोहीम सुरूच होती. आज सकाळी परिसरात शोध घेतला असता आणखी तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, नक्षलवादी दरवर्षी उन्हाळ्याच्या हंगामात मार्च ते जून दरम्यान त्यांच्या कारवाया तीव्र करतात.
या काळात बस्तर भागात सुरक्षा दलांवर मोठ्या प्रमाणात हल्ले झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 27 मार्च रोजी विजापूरच्या बासागुडा भागात सुरक्षा दलांनी चकमकीत सहा नक्षलवाद्यांना ठार केले होते. विजापूर जिल्हा बस्तर लोकसभा मतदारसंघात आहे जिथे पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.