नवी दिल्ली – तुर्कीयेची राजधानी इस्तंबुलमधील एका नाइट क्लबला काल रात्री लागलेल्या आगीमध्ये २९ जणांचा होरपळून मृत्यू झाला. नूतनीकरणाच्या कामामुळे ही आग लागली होती. या आगीमुळे कामगार आणि नाइट क्लबचे कर्मचारी इमारतीच्या आतमध्येच अडकून पडले होते. या दुर्घटनेनंतर चौकशीसाठी नाइट क्लबचे व्यवस्थापक आणि अन्य काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गंभीर भाजल्यामुळे एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे इस्तंबुलच्या गव्हर्नरांच्या कार्यालयाने म्हटले आहे.
द मस्क्युरेड नावाच्या नाईट क्लबला ही आग लागली होती. हा नाईट क्लब नूतनीकरणामुळे बंद होता. एकूण १६ मजल्याच्या रहिवासी इमारतीच्या तळमजल्यावर हा क्लब आहे. तळमजल्याला लागलेली ही आग तिसऱ्या मजल्यापर्यंत पोचली होती. त्यानंतर आग विझवण्यात यश आले.आग लागण्याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. त्याचा तपास घेण्यासाठी ३ सरकारी अधिकाऱ्यांची समिती नियुक्त करण्यात आली आहे.
आगीत मरण पावलेले बहुतेक नूतनीकरणाच्या कामाचे कामगार आहेत. आगीतून बाहेर काढलेल्यांपैकी काही जणांचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
नूतनीकरणाचे काम १० एप्रिलला संपणार होते. ईदच्या दिवशी क्लब पुन्हा सुरू करण्याचे नियोजन असतानाच ही दुर्घटना घडली आहे. क्लबच्या नूतनीकरणासाठी आवश्यक ती परवानगी क्लबच्या व्यवस्थापनाने घेतलेली नव्हती. या क्लबच्या मालकाशी संपर्क साधला जाऊ शकलेला नाही.