पुणे – प्रेमसंबंध संपविल्याच्या कारणातून भरदिवसा कॉलेज तरुणीवर कोयत्याने हल्ला केल्याची घटना गेल्या वर्षी सदाशिव पेठेत घडली होती. त्याच घटनेची पुनरावृत्ती सोमवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास सुभाषनगर येथील गल्ली क्रमांक 6 मध्ये होता-होता टळली.
अकरावीत शिकत असलेल्या तरुणीवर एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात अडवत कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र येथून जाणार्या महिलेने आरडा-ओरडा केल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन तरुण पळून गेले. पण, त्यांनी जाताना चांगलाच गोंधळ घातला. एका व्यक्तीला कोयता दाखवत धमकावले आणि अंधाधुंद कोयता फेकत गोंधळ घातला, असे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.
मात्र असा काही प्रकार घडला नसून, त्याच्याकडे कोयता होता. त्याने तरुणीसमोर धतींग करण्याचा प्रयत्न केल्याचे खडक पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. हा सर्व प्रकार सुभाषनगर भागात घडला असून, यामुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोयता बाळगणार्या तरुणाला पोलिसांनी रात्री उशीरा ताब्यात घेतले.
तो तळजाई टेकडी परिसरात पळून गेला होता. त्याने तरुणी बोलत नसल्याच्या रागातून हा प्रकार केल्याची प्राथमिक माहिती आहे. महेश सिद्धप्पा भंडारी (वय.22,रा. जनता वसाहत)असे कोयताधारी आरोपी तरुणाचे नाव आहे. त्याच्यासह अन्य एकाच्या विरुद्ध रात्री उशीरापर्यंत खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.