Maruti Suzuki Sales down: देशातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकीने मार्च महिन्यातील विक्रीची आकडेवारी जाहीर केली आहे. मारुतीच्या गाड्या सर्वाधिक विकल्या जातात. मात्र कंपनीच्या विक्रीत सातत्याने घसरण होत आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ज्या गाड्यांना सर्वाधिक पसंती दिली जाते, त्यांच्या विक्रीतही घसरण होत आहे.
या 7 कारच्या विक्रीत सातत्याने घट –
फेब्रुवारी आणि नंतर मार्चमध्ये… मारुतीच्या बलेनो (Baleno), सेलेरिओ (Celerio) डिझायर (Dzire), इग्निस (Ignis) स्विफ्ट (Swift), टूर एस (Tour S) आणि वॅगनआरच्या (WagonR) विक्रीत सातत्याने घट होत आहे. गेल्या महिन्यात कंपनीने या कारच्या एकूण 69,844 युनिट्सची विक्री केली होती तर गेल्या वर्षी कंपनीने या कारच्या 71,832 युनिट्सची विक्री केली होती. यावेळी कंपनी 1988 युनिट कमी विकू शकली आहे.
फेब्रुवारीमध्येही घसरण –
मारुतीच्या बलेनो, सेलेरियो, डिझायर, इग्निस, स्विफ्ट, टूर एस आणि वॅगनआरच्या विक्रीत यावर्षी फेब्रुवारीत देखील घट झाली. या फेब्रुवारीमध्ये कंपनीने ७१,६२७ मोटारींची विक्री केली होती, तर गेल्या वर्षी याच कालावधीत ७९,८९८ मोटारींची विक्री झाली होती.
मारुती सुझुकीची विक्री का कमी होत आहे ?
बलेनो, वॅगन-आर आणि स्विफ्ट नेहमीच टॉप 10 सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कारच्या यादीत राहतात, तर इग्निस, डिझायर आणि टूर-एसची विक्री फारसी झाली नाही. त्यामुळे एकूण विक्रीची आकडेवारी पाहिली तर कंपनीच्या कार विक्रीत घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.
याशिवाय अनेक नवीन मॉडेल्स कारही मार्केटमध्ये येत आहेत, त्यामुळे ग्राहक इतर ब्रँडकडे आकर्षित होत आहेत. सध्या, मारुती सुझुकी इलेक्ट्रिक वाहनांवर लक्ष केंद्रित करत आहे, कारण येणारे युग फक्त ईव्हीचा असेल.