सोरतापवाडी, (वार्ताहर)- चारचाकी गाडीच्या काळ्या काचा ठेवणे हे अनेक लोकांना शानशौकीन म्हणून आवडते. म्हणूनच चारचाकी गाडीच्या काचांवर काळी फिल्म लावली की आपली गाडी उठून दिसते, असे मत अनेक गाडी घेतलेल्या नागरिकांचे झाले आहे. पण या काळ्या काचेच्या नावाखाली दारू वाहतूक, गुटखा वाहतूक व इतर गैरधंदे सर्रास सुरू आहेत. त्याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाले आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसरपासून उरुळी कांचनपर्यंत अनेक ऊंचे लोग ऊंची पसंती या जाहिराती प्रमाणे अनेकांनी मोठ्या किंमतीच्या चारचाकी गाड्या घेतल्या असून, त्यावर काळी फिल्म लावली आहे; पण असे करणे बेकायदेशीर आहे. वाहतूक नियमांनुसार कारच्या काचेवर काळी फिल्म लावल्यास दंड आकारण्यात येतो.
कारण हे वाहतूक नियमांचे उल्लंघन करण्याच्या कक्षेत आहे. त्यामुळे काळ्या काचेवाले पोलिसांना बायबाय करून त्यांच्या समोरून जात आहे; तर पोलीस त्या गाडीकडे नुसते बघत आहेत. पुणे शहराच्या जवळील भागांचे झपाट्याने नागरिकीकरण झाले त्यातच शेतीचे रुपांतर गुंठेवारीमध्ये होऊन हातात पैसा येऊ लागला. त्यामुळे चारचाकी गाड्यांच्या संख्येत वाढ होऊन त्यावर काळ्या काचा आल्या. खर्या पण या काळ्या काचेखाली वेगळेच धंदे सुरू झाले.
एकीकडे टेम्पोमध्ये भाजी घेऊन चाललेल्या शेतकर्यांशी हुज्जत घालताना पोलीस दिसत आहे. त्याच वेळेस चारचाकी काळ्या काचेवाले पोलिसांना ओळख देऊन जात आहे. वाहतुकीचे नियम सगळ्यांना सारखेच असताना मोठ्यांना सुट व गरीबांची लुट अशी अवस्था झाली आहे.
नियम काय सांगतो?
कारच्या काळ्या काचा ठेवायच्या असतील, तर नियमानुसार, कारच्या बाजूच्या खिडक्यांवर 50 टक्के विजिबिलीटीसह ब्लॅक फिल्म, तसेच पुढील आणि मागील काचेवर 70टक्के विजिबिलीटी असलेली काळी फिल्म लावू शकतो, असा नियम आहे; परंतु पुणे-सोलापूर महामार्गावर संपूर्ण गडद काळी फिल्म लावलेल्या गाड्या दिसत असून नंबर प्लेट नसलेल्या गाड्या सुद्धा महामार्गावरुन काळ्या काचा लावून फिरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी यावर वेळीच कारवाई करावी अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे.