सोरतापवाडी, (वार्ताहर) – प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सोरतापवाडी ते तरडे गावाला जाणार्या रस्त्याचे भूमिपूजन ऑगस्ट 2023 मध्ये झाले. त्यानंतर गेले तीन महिने काम सुरू केले असून हे काम अतिशय संथ गतीने होत आहे. त्यामुळे तरडे ग्रामस्थांचे हा रस्ता कधी होणार, याकडे लक्ष लागले आहे.
तरडे गावाला जाण्यासाठी हा मुख्य रस्ता असून सोरतापवाडी येथील जुना कँनाल ते वरचे तरडे या 5.04 किलोमीटर रस्त्याची दुरवस्था झाली होती. सन 2004 मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून हा रस्ता झाला होता. सन 2004 नंतर या रस्त्यामुळे गावाच्या विकासास भर पडली.
येथील तरुण वेगवेगळे उद्योग धंदे करु लागले. भारत पेट्रोलियमचे मोठे टर्मिनल झाले. त्यामुळे गावात नागरिकरण वाढले. वाढत्या नागरिकरण लक्षात घेऊन या रस्त्याचे रुंदीकरण व दुरुस्ती तशीच राहिली होती. त्यामुळे या रस्त्याची रुंदीकरण व दुरुस्तीची मागणी जोर धरू लागली होती. गेली अठरा वर्षे या रस्त्याकडे कोणी लक्ष दिले नव्हते.
माजी सरपंच शरद जगताप व आदर्श सरपंच मारुती बरकडे यांनी शासन दरबारी सतत पाठपुरावा केला. त्यानंतर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सोरतापवाडी ते तरडे गावाला जाणार्या मुख्य रस्त्याचे भूमिपूजन ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आले. गेली दोन ते तीन महिने काम सुरू झाले असून काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. येथून जाणार्या मुरुमाच्या गाड्या व टँकर जाताना उडालेल्या धुळीमुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे.
या रस्त्याचे काम अतिशय संथ होत असून तरडे येथील दळणवळणाची गैरसोय रोजच होत आहे. तसेच रुग्णांना दवाखान्यात नेताना वळती व शिंदवणे मार्गे लांबून उरळी कांचनला जावे लागत आहे. लवकरात लवकर हा रस्ता चांगल्याप्रकारे तयार करण्यात यावा अशी मागणी अनेक ग्रामस्थांनी केली आहे. -मारुती बरकडे, आदर्श सरपंच तरडे