पारनेर (प्रतिनिधी) – नगर- पुणे महामार्गावरील तालुक्यातील सुपा गावात विविध उपक्रम राबवत यावर्षीही मोठ्या उत्साहाने शिवजयंती मनसे नेते अविनाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आली. नगर-पुणे महामार्गावर सातत्याने होणाऱ्या अपघातांमध्ये जखमींना क्षणाचाही विलंब न होऊ देता जबाबदारीने सेवा देणाऱ्या रुग्णवाहिका चालक यासह डॉक्टरांचा सन्मान उपस्थितांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी अण्णा हजारे युवा मंचाचे अध्यक्ष राहुल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी शिवयरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करत शिवजयंती उत्सवाचा शुभारंभ केला.
यावेळी सुपा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड, माजी सरपंच दत्ता पवार, योगेश रोकडे, सागर मैड ,अक्षय सुर्यवंशी, बाळासाहेब पवार, सुनिल पवार, प्रताप शिंदे, पप्पू पवार आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तालुक्यातील विविध मान्यवरांनी भेटी देऊन पुष्पहार अर्पण केला. शिवजयंती उत्सवानिमित्ताने सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांचे अविनाश पवार, नितीन म्हस्के यांनी शाल श्रीफळ देऊन स्वागत करत आदर्श शिवजयंती साजरी केली.